काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मकथेवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पुस्तकावर चर्चासत्रे होत आहेत. त्याच चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यासाठीच त्यांची सुरक्षा हटवल्याचा दावा केला होता. अशाच एका कार्यक्रमात खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी आठवणींच्या पेटाऱ्यातील एक झणझणीत किस्सा सर्वांसमोर मांडला. काकाला चोर म्हणणाऱ्याला चापट लगावल्याची माहिती त्यांनी दिली.
१९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकीतील पराभव आणि आणीबाणीनंतरचा काळ नेहरू आणि गांधी कुटुंबियांसाठी आव्हानात्मक होता. तसाच तो प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठीही कठीण काळ होता. या काळातील उलथापालथीचे परिणाम त्यांच्या बालमनावरही उमटत होते. राजकीय घडामोडींचा परिणाम त्यांच्या शालेय जीवनातही दिसून येत होता.
शाळेत विद्यार्थ्याला लगावली कानशिलात
‘व्हॉट मॉम लेफ्ट आऊट ऑफ हर बुक’ या नावाने एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात प्रियंका गांधी यांनी जुना किस्सा सांगितला आहे. १९७७ मधील निवडणुकीत इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा पराभव झाला होता. वातावरण तणावपूर्ण होते. शाळेत गेल्यावर प्रियंका गांधी यांना या सर्व प्रकाराचा सामना करावा लागत होता. शाळेतील एका मुलाने त्यांना टोमणा मारला. ‘तुझे काका चोर आहेत, म्हणून ते तुरुंगात आहेत,’ असे तो म्हणताच प्रियंका गांधी यांना फार राग आला आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. झालेल्या प्रकारामुळे शिक्षक त्यांच्यावर फार रागवले होते. निवडणुकीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या बाकावर कोणीच शेजारी बसले नाही. वर्गातील मित्र-मैत्रिणी त्यांच्याशी बोलणे टाळत असल्याची कटू आठवणही त्यांनी सांगितली.
वाढदिवसाच्या पार्टीला केवळ एक मित्र हजर
याच काळात त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी शाळेतील ३२ मुलांना वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले. वातावरण निवळावे आणि मैत्री वाढावी हा त्यामागील हेतू होता. पण ठरलेल्या वेळेवर केवळ एक वर्गमित्र आला. थोडा वेळ वाट पाहिली, तरी कोणी आले नाही. राहुल गांधी यांनी सांगितले की, हा मित्र आजही नियमित भेटतो आणि त्याच्याशी असलेली मैत्री आजही कायम आहे.
Leave a Reply