बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

श्रावणक्वीन ते ‘मैत्रेया’: आयुषी-रुचीचा नवा प्रवास

आयुषी भावे (२०१८ श्रावणक्वीन) आणि रुची जाईल (२०२३, पुणे) 'मैत्रेया'त मुख्य भूमिकेत झळकल्या. स्पर्धेऐवजी सहकार्य व स्वतःवरील विश्वासाची शिकवण त्यांनी सांगितली.

श्रावणक्वीन ते ‘मैत्रेया’: आयुषी-रुचीचा नवा प्रवास

सौंदर्य स्पर्धेच्या व्यासपीठावरून अनेक तरुणींनी आजवर मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेनं दिलेला आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि कलाक्षेत्रातील मार्गदर्शन तरुणींसाठी पुढच्या प्रवासाची भक्कम पायरी ठरलं आहे. या यादीत आता आणखी दोन नावांचा उल्लेख करावा लागेल. २०१८ ची ‘महाराष्ट्राची श्रावणक्वीन’ आयुषी भावे आणि २०२३ मधली पुणे केंद्राची ‘श्रावणक्वीन’ रुची जाईल या दोघीही ‘मैत्रेया’ या सिनेमातून मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत.

पहिल्याच मोठ्या चित्रपटात प्रमुख भूमिका

मनोरंजनक्षेत्रात स्वतःची वाट तयार करणाऱ्या या दोन्ही कलाकारांसाठी ‘मैत्रेया’ हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. पहिल्याच मोठ्या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळणं, ही दोघींसाठी आनंदाची आणि जबाबदारीची गोष्ट होती. मात्र हा अनुभव केवळ अभिनयापुरता मर्यादित न राहता, शिकण्याचा, एकमेकींना समजून घेण्याचा आणि सहकलाकार म्हणून एकत्र पुढे जाण्याचा ठरला, असं त्या सांगतात.

आयुषीसाठीही ‘मैत्रेया’ या चित्रपटाचा अनुभव विशेष ठरला आहे. ती म्हणाली, ‘मुख्य भूमिका म्हणून हा माझा पहिला चित्रपट आहे. या सिनेमाच्या निमित्तानं मला खूप चांगली माणसं भेटली. नव्या कलाकारांना मुख्य भूमिकेसाठी घेणं, ही मोठी गोष्ट असते. आमच्या लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर-वानखेडे यांनी घेतलेल्या कार्यशाळा, प्रत्येक कलाकाराला समजून घेण्याची त्यांची पद्धत आणि खुल्या चर्चेचं वातावरण यामुळे आम्हाला खूप शिकता आलं. माझ्यासाठी हा अनुभव केवळ चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो अभिनयाच्या प्रवासातील एक महत्त्वाची पायरी ठरला आहे.’

स्पर्धा नव्हे, सहकार्याची शिकवण

श्रावणक्वीन स्पर्धेच्या आठवणी सांगताना आयुषी भावूक झाली. ‘२०१८ची श्रावणक्वीन स्पर्धा मला आजही आठवते. त्यातून मी निकोप स्पर्धा म्हणजे काय, हे शिकले. एवढ्या सुंदर आणि प्रतिभावान मुली स्पर्धेत असतानाही आम्ही एकमेकींचा हात धरून पुढे जायला शिकलो. आजही त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. स्पर्धेच्या काळातही आम्ही एकमेकींसोबत होतो आणि त्यामुळेच आजही आम्ही एकत्र आहोत. या संस्कारांसाठी मी श्रावणक्वीन स्पर्धेची ऋणी आहे’, असं आयुषी म्हणाली.

चित्रपटाच्या निमित्तानं रुची जाईल म्हणाली, ‘स्पर्धा तेव्हाच होते, जेव्हा आपण खूप असुरक्षित असतो. एखाद्या मुलीनं चांगलं काम केलं, तर त्यामुळे माझं काहीतरी वाईट होईल, ही भावनाच चुकीची आहे. ‘मैत्रेया’ मध्ये मी आणि आयुषी सहकलाकार आहोत. ती प्रतिभावान आहे. ती तिच्या मेहनतीनं पुढे आली आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण असतं. त्यामुळे स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. ज्याच्याकडे प्रतिभा, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी आहे, ती व्यक्ती कुठल्याही मार्गानं पुढे येतेच.’

रुचीसाठी हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट असल्यानं सुरुवातीला थोडं दडपण होतं. मात्र चित्रपटासाठी घेतलेल्या कार्यशाळांमुळे अभिनयाची मूलभूत समज, कॅमेऱ्यासमोर वावरणं आणि व्यक्तिरेखेकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबाबत खूप शिकायला मिळालं, असं ती सांगते. श्रावणक्वीनच्या मंचावरून मिळालेला आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवण्याची शिकवण या दोघींना ‘मैत्रेया’च्या प्रवासात उपयोगी पडली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance