दाट आणि लांबसडक केसांसाठी ते दर महिन्याला कापावेत का, असा समज अनेकांमध्ये दिसून येतो. केस कापल्याने ते झटपट वाढतात का, लांब केसांसाठी किती दिवसांनी केस कापावेत आणि याबाबत विज्ञान काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
केसांची वाढ कशावर अवलंबून असते?
केसांची वाढ टाळूच्या त्वचेखालील केसांच्या मुळावर अवलंबून असते. आपण कापतो तो केसांचा भाग मृत पेशींपासून तयार झालेला असतो. त्यामुळे खालून केस कापल्याने मुळाच्या वाढीचा वेग बदलत नाही. साधारणपणे दर महिन्याला माणसाच्या डोक्यावरील केसांची वाढ अर्धा इंच होते, असे मानले जाते. अर्थात ही वाढ अनुवांशिकता, वय, पोषण, हार्मोनल समतोल, ताणतणाव आणि केसांचे आरोग्य यावर अवलंबून असते.
केस कापण्याचा खरा फायदा काय?
केस कापण्याचा त्यांच्या वाढीशी थेट संबंध नसतो. मात्र केसांची गुणवत्ता आणि आरोग्य सुधारण्यासाठी केस कापणे फायदेशीर ठरते. केसांचे टोक फाटणे किंवा कोरडेपणा आणि तुटण्याची समस्या वाढल्यास केस खालून तुटतात, त्यामुळे लांबी वाढत नाही आणि केस विरळ दिसतात. नियमित अंतराने टोकाकडील खराब झालेले, फाटलेले केस कापल्यास तुटणे थांबते. लांब केस हवे असतील तर दर महिन्याला कापणे योग्य ठरणार नाही, पण फाटे फुटत असतील तर खालच्या बाजूला किंचित कापणे चांगले ठरू शकते. काहींच्या मते दोन ते तीन महिन्यांतून एकदा केस कापणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. मात्र अनेक दिवस केस कापले नाहीत तर गुंता वाढू शकतो, फाटे फुटलेले केस वाढतात आणि विंचरण्यात अडचण येते. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक पदार्थांवर भर देणे आणि पचनशक्ती चांगली असणेही महत्त्वाचे आहे. ही सामान्य माहिती असून केसांची रचना प्रत्येकाची वेगळी असते; कोणत्याही उपचारापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply