बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अंगद हसीजाला खाजगी कार्यक्रमासाठी १६ लाखांची ऑफर

बिदाई फेम अभिनेता अंगद हसीजाला कार्यक्रमासाठी १५ ते १६ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. हेतू समजताच त्याने पैसे परत केले आणि कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला.

अंगद हसीजाला खाजगी कार्यक्रमासाठी १६ लाखांची ऑफर

‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंगद हसीजा सध्या एका धक्कादायक अनुभवामुळे चर्चेत आला आहे. एका खाजगी कार्यक्रमासाठी त्याला तब्बल १५ ते १६ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र कार्यक्रमामागचा खरा हेतू लक्षात येताच त्याने पैसे परत केले आणि कार्यक्रमाला जाण्यास स्पष्ट नकार दिला. हा अनुभव त्याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितला आहे.

कार्यक्रमाबाबत सुरुवातीला काहीच स्पष्ट नव्हते

करिअरच्या एका टप्प्यावर अंगदला देश-विदेशातील अनेक कार्यक्रमांसाठी बोलावले जात असे. अशाच एका कार्यक्रमासाठी त्याला फोन आला होता. मात्र कार्यक्रम नेमका कुठे आहे, तिथे काय करायचे आहे आणि त्याच्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा आहे, याबाबत सुरुवातीला कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. त्याने आयोजकांना कार्यक्रमात नेमके काय करायचे आहे, नृत्य करायचे आहे का आणि कपडे कसे असतील, असे प्रश्न विचारले. त्यावर समोरच्या व्यक्तीने हा एक खाजगी कार्यक्रम असल्याचे सांगितले. सुरुवातीला अंगदला हा एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा छोटेखानी पार्टी असावी, असे वाटले. त्या काळात एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याला इतके पैसे मिळत नव्हते. त्यामुळे एवढी मोठी रक्कम ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला या ऑफरमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.

होकाराआधीच खात्यात पैसे आले

आयोजकांकडून वारंवार कार्यक्रमाला येण्याबाबत विचारणा केली जात होती. काही अडचण तर नाही ना, असेही त्याला विचारण्यात आले. त्यामुळे अंगदने कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्याचा आग्रह धरला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्याला, ‘तुम्हाला माहीतच असेल. सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही पेड आहात’, असे उत्तर दिले. हे ऐकून अंगदला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे, अंगदने कार्यक्रमाला होकार देण्याआधीच त्याच्या खात्यात १६ लाख रुपये जमा करण्यात आले होते. या प्रकारानंतर अंगदने क्षणाचाही विलंब न करता पैसे परत केले आणि कार्यक्रमाला जाण्यास स्पष्ट नकार दिला. या संपूर्ण अनुभवामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता आणि या फोन कॉलमुळे बराच काळ त्याला तणाव जाणवत होता. अंगदने सांगितले की, या सगळ्या प्रकारामुळे त्याला खूप लाजिरवाणे वाटले. समोरच्या व्यक्तीने सर्व कलाकार अशा प्रकारे पैसे घेतात आणि हे सामान्य असल्याचे सांगण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र अंगदने अशा प्रकारच्या व्यवहारापासून स्वतःला दूर ठेवले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance