लग्न म्हटले की पाहुण्यांची सरबराई आलीच. जेवण, नाश्ता, बसण्याची व्यवस्था आणि पिण्याचे पाणी — या सगळ्याची तयारी करावी लागते. पण एका माजी आमदाराच्या मुलीच्या लग्नात पाहुण्यांसाठी पाण्याची अशी व्यवस्था करण्यात आली आहे की ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा पाहून लोकही चक्रावले आहेत. या लग्नासाठी तब्बल पाच लाखांहून अधिक पाण्याच्या बाटल्या मागवल्याचा दावा केला जात आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
ट्रॅक्टरच्या रांगा पाहून लोक थक्क
सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलींमध्ये पाण्याच्या बाटल्यांचे मोठमोठे बॉक्स आणि गठ्ठे भरून आणले जात असल्याचे दिसत आहे. एक ट्रॅक्टर येतो, त्यानंतर दुसरा येतो — अशा पद्धतीने ट्रॅक्टर येतच जात आहेत. बाटल्यांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या लांब रांगा लागल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते.
माजी आमदार अनंत सिंह यांच्या मुलीचे लग्न २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लग्नासाठी बिहारसह देशाच्या इतर भागांतूनही पाहुणे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहुण्यांची संख्या चार ते पाच लाखांपर्यंत असू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या गर्दीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधीपासूनच करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
१५० पदार्थ आणि घोड्यांची शर्यतही
या लग्नाची चर्चा केवळ पाण्याच्या बाटल्यांमुळेच नाही, तर इतर तयारींमुळेही सुरू आहे. पाहुण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे १५० प्रकारचे पदार्थ तयार करण्यात येणार असून, शेकडो आचारी आणि कामगार या कामात गुंतले आहेत. लग्नासाठी भव्य मंडप आणि पंगतीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या लग्नाचा आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे घोड्यांची शर्यत. या शर्यतीतील विजेत्याला महिंद्रा थार, दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला बुलेट आणि तिसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला स्कूटर देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा