मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, अभिनय क्षेत्रातील सुरुवातीच्या काळात त्यांना काही कटू अनुभवांचाही सामना करावा लागला. असाच एक प्रसंग त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. हिंदीतील लोकप्रिय ‘चाचा चौधरी’ या मालिकेच्या सेटवर त्यांच्यासोबत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती.
आदल्या दिवशी कौतुक, दुसऱ्या दिवशी अपमान
वर्षा दांदळे यांनी करिअरच्या सुरुवातीला अनेकदा मॉब आर्टिस्ट म्हणून काम केले होते. त्याच काळात त्यांना ‘चाचा चौधरी’ या हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या प्रसंगाच्या आदल्या दिवशीच त्यांनी एका मराठी मालिकेत दमदार अभिनय केला होता. ‘फिर्याद’ या मालिकेत त्यांना एका दिवसासाठी काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये मुलाचा खून झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मुलासाठी न्याय मागणाऱ्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांचा अभिनय पाहून सेटवर टाळ्याही वाजवण्यात आल्या होत्या. आदल्या दिवशी मिळालेल्या कौतुकामुळे आनंदात असलेल्या वर्षा दुसऱ्या दिवशी ‘चाचा चौधरी’च्या सेटवर पोहोचल्या.
मेकअप रूमचा प्रसंग आणि दिवसभराची वाट
सेटवर गेल्यानंतर त्यांना सुरुवातीलाच बाहेर बसवण्यात आले. त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा हवी होती. त्यामुळे त्यांनी सेटवरील एका व्यक्तीकडे विचारणा केली. त्याने त्यांना एका खोलीत जाण्यास सांगितले. वर्षा त्या खोलीत साडी बदलत असताना अचानक दरवाजा वाजवण्यात आला. आपण कपडे बदलत असल्याचे त्यांनी दरवाजाबाहेरील व्यक्तीला सांगितले. मात्र, पुन्हा दरवाजा वाजवण्यात आल्याने त्यांचा आवाज चढला आणि त्यांनी मोठ्या आवाजात ‘चेंजिंग’ असे सांगितले. साडी बदलून झाल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी समोर ‘चाचा चौधरी’च्या पत्नीची भूमिका साकारणारी एक ज्येष्ठ अभिनेत्री उभी होती. ती अभिनेत्री रागाने आपल्याकडे पाहत असल्याचे वर्षा यांच्या लक्षात आले. नंतर त्यांना कळले की, ती खोली त्या अभिनेत्रीची पर्सनल मेकअप रूम होती. वर्षा यांना मात्र ती सर्व महिला कलाकारांसाठी कपडे बदलण्याची खोली असल्याचे वाटले होते. या नंतर वर्षा यांना सेटवर वेगळीच वागणूक दिली गेली. त्यांना दिवसभर मॉब आर्टिस्ट म्हणूनही उभे करण्यात आले नाही. उलट दिवसभर त्यांना झाडाखाली बसवून ठेवण्यात आले. आपला सीन कधी शूट होणार, याची त्या वाट पाहत होत्या. प्रोडक्शन टीममधील लोकांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडून ‘आयेगा, आयेगा’ असेच उत्तर मिळत होते. अखेर रात्री नऊ वाजता पॅकअप झाले. त्यावेळी आपला सीन शूट का केला नाही, अशी विचारणा वर्षा यांनी केली. त्यावर शूटिंग संपले असून आपले पैसे घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्या काळात कलाकारांना रोख पैसे दिले जात असत. त्यामुळे पैसे घेऊन वर्षा तिथून निघाल्या. मात्र, दिवसभर आपल्यासोबत नेमके काय घडले, हे त्यांना तेव्हा समजले नव्हते. पुढे अभिनय क्षेत्रात अनुभव वाढल्यानंतर त्यांना या प्रसंगामागचे कारण समजले. संबंधित अभिनेत्रीच्या वैयक्तिक मेकअप रूममध्ये आपण साडी बदलली आणि त्यावेळी मोठ्या आवाजात बोलल्यामुळे तिचा अहंकार दुखावला गेला असावा, असे वर्षा यांच्या लक्षात आले.
Leave a Reply