रविवार, सकाळी १०-१०:१५ ची वेळ. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. गुलाबी फ्लेमिंगो, क्रेन, रंगबिरंगी बदक, गरुड, चित्रबलाक पाहण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू होती. अशा गजबजाटात मी आपला कॅमेरा घेऊन एका कमी वापरातल्या निसर्ग पाऊलवाटेने निघालो—काहीतरी खास टिपायला. साधारण ५००-५५० मीटर पुढे गेल्यावर एका उथळ काठावर एक ढोकरी ज्याला वंचक अथवा कोक बगळा म्हणतात तो शांत उभा दिसला. उथळ काठावर, माती आणि गवताच्या छटांमध्ये सहज मिसळून गेलेला हा भारतीय गायबगळा जणू निसर्गाच्या संयमाची शांत मूर्ती उभी होती. तपकिरी-पिवळसर रेषांची देहबोली, पिवळसर पाय आणि चोचीला लटकलेला पाण्याचा टेंभा—यांच्यामध्ये ‘वळवळणारा गांडूळ’ , चिखल आणि आकाशाच्या मध्ये एका क्षणासाठी थांबलेला दिसला. खाली पाण्यात उमटलेले त्याचे प्रतिबिंब हाच क्षण अधिक गडद करत होते. शांत पाण्याच्या आरशावर पडणाऱ्या लहानशा तरंगांची वर्तुळे हळूहळू पसरत होती आणि निसर्गातील प्रत्येक लहान हालचालीला आपला असा अर्थ असतो, याची साधी पण खोल जाणीव करून देत होती.
जिथे चिखल आणि आरसा एकत्र येतात आणि वेळ एका श्वासापुरती थबकते, तिथे एक साधा पक्षी आपला शांत घास मिळवतो—आणि पाणथळ जागा स्वतःचं जगणं कसं टिकवून ठेवायचं, हे पुन्हा एकदा सांगते.
हा वरकरणी सामान्य वाटणारा प्रसंग पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
अन्नसाखळीचे संतुलन बगळ्यासारखे पक्षी कीटक, गांडुळे, उभयचर आणि लहान जलचरांवर उपजीविका करून त्यांचे प्रमाण नैसर्गिक मर्यादेत ठेवतात.
ओलसर काठावर गांडुळाचे अस्तित्व हे त्या जमिनीतील सेंद्रिय घटकांचे, मोकळ्या पोताचे आणि टिकून राहिलेल्या ओलाव्याचे निदर्शक आहे.
हे अनेक जीवांसाठी आश्रय आणि अन्नाचे ठिकाण असते; असे छोटे अधिवास टिकून राहिल्यास संपूर्ण पाणथळ परिसंस्था जिवंत राहते.
निसर्गाचा समतोल केवळ दुर्मीळ दर्शनांवर किंवा अपवादात्मक घटनांवर टिकून नसतो; तो रोजच्या, शांत आणि सातत्याने घडणाऱ्या प्रक्रियांवर उभा असतो. आपण जेव्हा नेहमीच्या, परिचित गोष्टींकडे थांबून, शांत मनाने आणि कौतुकाने पाहतो, तेव्हा आपल्याला सभोवतालच्या निसर्गाची खरी खोली कळते. मोठ्या चमत्कारांच्या शोधात आपण पायाखालच्या शांत, अर्थपूर्ण जगाकडे दुर्लक्ष करू नये—कारण त्याच छोट्या धाग्यांनी निसर्गाची वीण घट्ट बांधलेली असते. तसंच आपण रोजच्या आयुष्यातही अनेकदा असाच अनुभव घेतो. मोठ्या आनंदाच्या, भौतिक बदलांच्या आणि ‘काहीतरी खास’ मिळवाण्याच्या धावपळीत आपण रोजच्या छोट्या, शांत आणि आनंदाच्या क्षणांकडे सहज दुर्लक्ष करतो. असामान्य गोष्टींचा शोध नक्कीच घ्यावा; पण त्या शोधात आपल्या सभोवतालचा साधा, सहज आणि सामान्य आनंद गहाळ होऊ नये, इतकीच जाणीव ठेवायला हवी.
— हिरालाल चौधरी
(वन परिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर)
Leave a Reply