ऊसदराच्या प्रश्नावरून अहिल्यानगर जिल्ह्यात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊसतोड बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने साखर कारखानदारांना निर्देश दिले असून, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे.
या बैठकीतून दोन दिवसांत ठोस निर्णय झाला नाही, तर रस्ता रोको आंदोलन केले जाईल. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही, तर रेल्वे रोको आंदोलनही करू, असा आक्रमक इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे.
कारखानदारांनी स्वतः उपस्थित राहण्याचे आदेश
प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ नुसार साखर कारखानदारांना बैठकीस स्वतः उपस्थित राहण्याचे बंधन घातले आहे. कोणत्याही प्रतिनिधी अथवा व्यवस्थापकीय संचालकांना पाठवू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत तोडणी झालेल्या उसाचे गाळप करून, २६ नोव्हेंबरपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड स्थगित ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राजकीय पदांपेक्षा शेतकऱ्यांचे हित मोठे
आपल्या राजकीय पदांपेक्षा शेतकऱ्यांचे हित मोठे असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. आमदारकी किंवा खासदारकीपेक्षा शेतकरी महत्त्वाचा असल्याचे सांगत, शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी कोणालाही अंगावर घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची वेळ आली, तरी मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांकडून होणाऱ्या कथित रिकव्हरी चोरीचा मुद्दा उपस्थित केला. २०११ पूर्वी अनेक कारखान्यांची साखर उतारा क्षमता १२ टक्क्यांच्या पुढे होती. मात्र, आता एक टक्का रिकव्हरी कमी दाखवली जाते. म्हणजेच प्रत्येक टक्का रिकव्हरीमागे १० किलो साखरेची चोरी होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. या माध्यमातून कारखानदारांकडून काळा पैसा तयार केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. या साखरेची विक्री काळ्या बाजारात केली जाते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशावर पाच टक्के जीएसटीही भरला जात नसल्याने सरकारचीही फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हा काळा पैसा जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपर्यंत वापरला जातो, असे शेट्टी म्हणाले. हाच पैसा लंके यांच्या विरोधातही वापरला जातो, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी लंके यांच्यासमोरच केली. आता २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply