रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते. बँकांना कामकाज करताना बँकिंग नियमन कायदा आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक असते. रिझर्व्ह बँकेमुळे देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे चालते. मात्र, रिझर्व्ह बँकेने तीन मोठ्या बँकांची नावे जाहीर केली आहेत. या तीन बँका बुडाल्यास देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडू शकते, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक.
या बँका का महत्त्वाच्या?
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की या बँकांना प्रणालीगतदृष्ट्या महत्त्वाच्या बँका म्हटले जाते. या बँकांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि बँकिंग व्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. यापैकी एखादी बँक अचानक बुडाल्यास याचा परिणाम पूर्ण बँकिंग व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. यामुळेच या बँकांना ‘टू बिग टू फेल’ म्हणजेच इतक्या मोठ्या बँका म्हटले जाते की त्या बुडाल्यास मोठे संकट निर्माण होऊ शकते.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या बँकांना सर्वसाधारण पैशांऐवजी अतिरिक्त पैसे ठेवावे लागतात. याचा अर्थ कोणत्याही आर्थिक संकटात बँकेला नुकसान सहन करण्यासाठी पुरेसे पैसे असले पाहिजेत. या नियमानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यांच्या जोखमीच्या हिशोबानुसार निश्चित संपत्तीच्या ०.८० टक्के रक्कम अतिरिक्त ठेवावी लागेल. एचडीएफसी बँकेला ०.४० टक्के पैसे अतिरिक्त ठेवावे लागतील, तर आयसीआयसीआय बँकेला ०.२० टक्के रक्कम अतिरिक्त ठेवावी लागेल. रिझर्व्ह बँकेने २०१५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला या श्रेणीत ठेवले होते. त्यानंतर २०१६ मध्ये आयसीआयसीआय बँक आणि २०१७ मध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश करण्यात आला.
खातेदारांवर काय परिणाम होणार?
या तीन बँकांमध्ये ज्या ग्राहकांची खाती असतील त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. या नियमाचा मुख्य उद्देश बँकिंग व्यवस्था सुरक्षित ठेवणे हा आहे. या नियमामुळे या मोठ्या बँकांना आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे असतात. यामुळे बँकिंग व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढण्यास मदत होते.
Leave a Reply