बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

भिवंडीत शोरमामुळे १७ जणांना विषबाधा; दुकानावर जेसीबी

भिवंडीत शोरमा खाल्ल्याने १७ जणांना अन्न विषबाधा झाली. वंजारपट्टी नाका येथील दुकानावर महापालिकेने जेसीबीने तोडक कारवाई केली. रुग्णालयात १३ जणांवर उपचार सुरू.

भिवंडीत शोरमामुळे १७ जणांना विषबाधा; दुकानावर जेसीबी

भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्याने पुन्हा एकदा अन्न विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील एका चिकन शोरमा दुकानातून सोमवारी रात्री शोरमा खाल्लेल्या १७ जणांना उलटी, जुलाब आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. या सर्वांना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अनेकांनी या दुकानातून शोरमा खाल्ला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून काही जणांची प्रकृती बिघडू लागली. एकाच कुटुंबातील पाच जणांना एकाच वेळी त्रास झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. शोरमा खाल्ल्यानंतरच हा त्रास सुरू झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.

एकूण १४ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून सध्या १३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये लहान मुलांसह एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवली आहे.

महापालिकेची तोडक कारवाई

रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधवी पंदारे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अधिकारीही रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी आणि अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यामध्ये प्रभाग समिती क्रमांक पाचचे सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे, आपत्कालीन कक्षप्रमुख साकिब खरबे आणि आरोग्य अधिकारी फैसल तातली यांचा समावेश होता. निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

त्यानंतर महापालिकेने संबंधित दुकानावर थेट तोडक कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने शोरमा विक्रीची टपरी जमीनदोस्त करण्यात आली. या प्रकरणी निजामपूर पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित दुकानाविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर यांनी दिली आहे.

पाच महिन्यांपूर्वीही अशीच घटना

पाच महिन्यांपूर्वी भिवंडी शहरात चिकन शोरमा खाल्ल्याने तब्बल १०७ जणांना अन्न विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही शहरातील खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबतचे प्रश्न कायम असल्याचे या नव्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे. भिवंडीतील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance