सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अखेर फुटली आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ३ हजार २५० रुपये अधिक १०० अधिक १०० असा ऊस दराचा फॉर्म्युला मान्य केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार पहिली उचल ३ हजार २५० रुपये, ऊसाचे गाळप संपल्यानंतर १०० रुपये आणि साखरेला जर वर्षभर ४५ रुपयांच्या पुढे दर राहिला तर १०० रुपयांचा हप्ता देण्याचे कारखान्याने मान्य केले आहे.
३५०० रुपयांची मागणी आणि गव्हाण बंद आंदोलन
ऊस दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा पिंपळनेरमधील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना बंद पाडला होता. उसाला पहिली उचल ३ हजार ५०० रुपये दिल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली होती. राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर कारखान्यावर थेट गव्हाण बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी ३ हजार २५० अधिक १०० अधिक १०० असा फॉर्म्युला दिला होता, मात्र कारखानादारांना तोही मान्य नव्हता. लवकरात लवकर दर जाहीर करावा, नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
काल सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यावर गव्हाण बंद आंदोलन सुरू केले होते. कारखाना प्रशासनाने दराबाबतचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. कारखाना प्रशासनाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना दराबाबतचे अधिकृत पत्र देण्यात येणार आहे. परिणामी ऊस दराची कोंडी फुटली असून आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
Leave a Reply