आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली, पण हा उत्साह फार काळ टिकला नाही. बाजार उघडताच सेन्सेक्सने मोठी झेप घेतली आणि निफ्टीही महत्त्वाच्या पातळीकडे वाटचाल करू लागला. मात्र अवघ्या दहा मिनिटांतच चित्र पूर्णपणे पालटलं आणि दोन्ही निर्देशांक वेगाने खाली कोसळले. जागतिक बाजारांमधील घसरणीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला.
सेन्सेक्सची ७४३ अंकांची झेप आणि अचानक घसरण
सोमवारच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने मागील बंद पातळी ८३,९१९ वरून ८४,४२१ वर सुरुवात केली. सुरुवातीच्या खरेदीमुळे निर्देशांकाने काही मिनिटांतच ७४३ अंकांची वाढ नोंदवत ८४,६६२ चा उच्चांक गाठला. मात्र विक्रीचा दबाव वाढताच सेन्सेक्सने जोरदार घसरण सुरू केली आणि पाहता पाहता ६५८ अंकांनी खाली येत ८३,२१० ची पातळी गाठली.
निफ्टीचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. मागील सत्रात २५,८०० वर बंद झालेल्या निफ्टीने सोमवारी २५,९२९ वर व्यवहार सुरू केला. सुरुवातीच्या तेजीमुळे तो २५,९९२ पर्यंत पोहोचला. मात्र त्यानंतर अचानक विक्रीचा जोर वाढला आणि निफ्टी घसरून २५,५६७ च्या पातळीवर आला. गिफ्ट निफ्टीमध्ये सुमारे १५० अंकांची वाढ असल्याने देशांतर्गत बाजारातही तेजी राहण्याची अपेक्षा होती, पण आंतरराष्ट्रीय बाजारांमधील घसरणीने या तेजीत अडथळा आला.
जागतिक बाजारातील पडझड आणि क्षेत्रनिहाय चित्र
जपानच्या निक्केई निर्देशांकात ३,००० हून अधिक अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक ५ टक्क्यांपेक्षा अधिक खाली आला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही जवळपास १ टक्क्याने घसरला. दक्षिण कोरियाच्या कोस्पी निर्देशांकात सुमारे १६० अंकांची म्हणजेच ३.२० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. याशिवाय ब्रिटनच्या शेअर बाजारातही १ टक्क्याहून अधिक घसरण पाहायला मिळाली.
बाजारात मोठी घसरण सुरू असतानाही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही प्रमुख शेअर्समध्ये मात्र चांगली तेजी पाहायला मिळाली. टीसीएसच्या शेअरमध्ये ३.२० टक्के, टेक महिंद्रामध्ये २.८० टक्के, इन्फोसिसमध्ये २.५० टक्के आणि एचसीएल टेकमध्ये १.९० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दुसरीकडे बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला. टाटा स्टीलचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला. अॅक्सिस बँकेत २.५० टक्के, एसबीआयमध्ये २.६० टक्के, आयसीआयसीआय बँकेत १.३५ टक्के आणि एचडीएफसी बँकेत १.१५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील घडामोडी आणि विविध क्षेत्रांमधील विक्रीचा दबाव यामुळे बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ बाजारातील सुरुवातीची तेजी पाहून गुंतवणुकीचे निर्णय घेणे टाळावे.
Leave a Reply