शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी ४ ते ९ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या काळात न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. या मोर्चावरून त्यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मोर्चात सहभागी होऊ नये, असे पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विरोधाच्या चर्चा निराधार असल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण
रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनाला पक्षातून विरोध होत असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. नेत्यांना असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. २६ तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या निरोपाचा कोणीतरी वेगळाच अर्थ लावल्याचंही त्यांनी नमूद केलं. यापूर्वी रोहित पवार यांनी नाशिकसह जिथे जिथे आंदोलनं केली, तिथे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते, असं शिंदे यांनी सांगितलं.
पक्षाची अट काय?
हा शरद पवार यांचा पक्ष असून कोणताही निर्णय एकत्रित चर्चेतून झाला पाहिजे, असं शशिकांत शिंदे म्हणाले. सध्याचा ट्रॅक्टर मोर्चा दुष्काळ आणि टँकरच्या प्रश्नावर असला, तरी विदर्भ आणि मराठवाड्याचे इतर प्रश्नही एकत्र घेतल्यास आंदोलनाची तीव्रता अधिक वाढेल, असं त्यांनी नमूद केलं. पक्षाची मंजुरी आणि चर्चा करून चिन्हावर आंदोलन केल्यास हरकत नाही. मात्र, चिन्हाशिवाय आंदोलन करण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
सर्व नेते मोर्चात उतरतील, असा विश्वास
यापूर्वीही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांबाबत किंवा अजित पवार यांच्या अपघाताबाबत वैयक्तिक पातळीवर भूमिका मांडली होती. त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचं स्वातंत्र्य असून त्यांच्यावर पक्षाचं बंधन नसावं, असं शिंदे म्हणाले. रोहित पवार यांनी शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन मोर्चा काढल्यास पक्षाचे सर्व नेते शंभर टक्के त्यांच्यासोबत आंदोलनात उतरतील, असा विश्वासही प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
Leave a Reply