महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील घडामोडी चांगल्याच चर्चेत आहेत. एकीकडे आमदार रोहित पवार अजित पवार अपघात प्रकरणावरून महायुती सरकारला सातत्याने धारेवर धरत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या नागपुरातील आंदोलनावरून आता पक्षांतर्गत राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
रोहित पवारांनी पुकारलेल्या ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ला शरद पवार गटाकडून अपेक्षित पाठिंबा मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काही ठोस घोषणा होत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर शेगाव ते बुटीबोरीमार्गे नागपूर विधानभवनापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी रोहित पवारांची बैठकही पार पडली आहे. मात्र, या आंदोलनाला पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांची कितपत साथ मिळणार, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
शरद पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांना काय सूचना?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटातील विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना रोहित पवारांच्या आंदोलनात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. यासाठी नागपूरमध्ये विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून ज्या सूचना येतील, त्याच पाळाव्यात, असे निर्देश स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या मोर्चासाठी पक्षाकडून संघटनात्मक ताकद उभी राहणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
एनडीएसोबत जाण्याच्या चर्चेमुळे राजकारण तापले?
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, रोहित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. पक्षाने सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यास आपण पर्यायी मार्ग निवडू, असे संकेतही त्यांनी यापूर्वी दिले होते.
यामुळे पक्षातील वेगवेगळ्या भूमिकांची चर्चा रंगू लागली आहे. आता नागपूरच्या मोर्चापासून पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्याच्या बातमीमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. आता रोहित पवारांच्या पुढच्या निर्णयाची खरी उत्सुकता लागली आहे. पक्षाच्या भूमिकेला ते कसे उत्तर देणार? नागपूरच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या राजकारणात काही नवे समीकरण तयार होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply