सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक झाली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
४८ तासांत पाणी, चाऱ्याचे गावनिहाय सर्वेक्षण
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गोरे यांनी सांगितले की, अर्ज केल्यापासून ४८ तासांच्या आत संबंधित गावात पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पशुधन आणि धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी चाऱ्याचे तातडीने गावनिहाय सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. चारा टंचाई असलेल्या गावांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे.
पाणीसाठा आणि सिंचनाबाबत निर्णय
उपलब्ध पाणीसाठे सुरक्षित ठेवण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. जिहे-कठापूरचे पाणी सध्या सुरू असून उरमोडीचे दुसरे आवर्तन १ जानेवारीला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे, नवीन बंधारे उभारणे, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आणि ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
Leave a Reply