सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर अनेकजण जुने दागिने विकण्याचा विचार करत असतील. मात्र दागिने विकण्याची घाई करू नका. कारण बाजारात सोन्याचा जो दर सुरू असतो, त्याच दराने जुन्या दागिन्यांचे पैसे मिळतीलच असं नाही. दागिन्यांची शुद्धता, वजन आणि त्यामध्ये असलेले इतर धातू यांचा विचार करून ज्वेलर्स पैसे देतात. त्यामुळे जुने सोने विकण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.
शुद्धता आणि वजन तपासून घ्या
तुमच्याकडे २२ कॅरेटचे दागिने असले तरी त्यांची शुद्धता प्रत्यक्ष तपासणीत वेगळी निघू शकते. जुन्या दागिन्यांची दुरुस्ती किंवा त्यातील इतर धातूंमुळे शुद्धतेत फरक पडू शकतो. त्यामुळे दागिने विकण्याआधी त्यांची शुद्धता तपासून घ्या. दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्क आणि एचयूआयडी क्रमांक असल्यास बीआयएस केअर अॅपवर त्याची माहिती तपासता येते. दागिन्यांचं एकूण वजन आणि त्यातील सोन्याचं वजन वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ, तुमच्या २० ग्रॅमच्या चेनमध्ये २ ग्रॅम वजनाचे खडे किंवा इतर भाग असतील, तर सोन्याचं वजन फक्त १८ ग्रॅम धरलं जाऊ शकतं. त्यामुळे पैसे ठरवण्यापूर्वी सोन्याचं नेमकं वजन किती आहे, हे विचारा.
मेकिंग चार्जचे पैसे परत मिळत नाहीत
नवीन दागिने खरेदी करताना सोन्याच्या किमतीसोबत मेकिंग चार्ज आणि कर द्यावा लागतो. मात्र जुने दागिने विकताना हे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे खरेदीच्या बिलावरील रक्कम आणि विक्रीत मिळणारी रक्कम सारखी असेल, अशी अपेक्षा ठेवू नका. काही ज्वेलर्स दागिने वितळवणे किंवा शुद्धीकरणाच्या नावाखाली पैसे कमी देतात. त्यामुळे किती पैसे आणि कोणत्या कारणासाठी कापले जात आहेत, याची स्पष्ट माहिती घ्या. थोडक्यात, जुने सोने विकताना घाई करण्याऐवजी त्याची शुद्धता, वजन आणि बाजारभाव समजून घ्या. दोन-तीन ठिकाणचे दर तपासा आणि सर्व माहिती स्पष्ट झाल्यानंतरच दागिने विकण्याचा निर्णय घ्या.
Leave a Reply