सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

हापूसवर गुजरात-तामिळनाडूची दावेदारी, कोकणी उत्पादकांची धडपड

हापूस आंब्याला २०१८ मध्ये मिळालेले भौगोलिक मानांकन टिकवण्याचे आव्हान उत्पादकांपुढे आहे. गुजरात, जुन्नर आणि तामिळनाडूतूनही ‘हापूस’वर दावेदारी करण्यात आली आहे.

हापूसवर गुजरात-तामिळनाडूची दावेदारी, कोकणी उत्पादकांची धडपड

सुमारे आठ वर्षांपूर्वी भौगोलिक मानांकन मिळालेल्या कोकणातील हापूस आंब्याचा दबदबा देश-विदेशातील आंबा बाजारात कायम आहे. तरीही ही नाममुद्रा टिकवण्याचे मोठे आव्हान उत्पादकांपुढे आहे. जुन्नरमधील शिवनेरी, गुजरातचा वलसाड आणि तामिळनाडूतूनही ‘हापूस’वर दावेदारी करण्यात येत असताना कोकणच्या हापूसचे भौगोलिक मानांकन टिकवण्यासाठी कोकणातील उत्पादकांनी आता लोकप्रतिनिधींना साद घातली आहे.

पाच जिल्ह्यांना मिळालेले मानांकन

कोकणातील हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत आणि मागणी आहे. या हापूसला भौगोलिक मानांकन मिळवण्याचे प्रयत्न २०१० पासून जोरकसपणे सुरू झाले होते. तत्कालीन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने कोकणातील हापूस आंब्याला २०१८ मध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील हापूस उत्पादकांना या मानांकनाचा बहुमान मिळाला.

दावेदारी आणि कायदेशीर संघर्ष

आता ‘हापूस’ या नावासाठी अनेकांनी दावेदारी केली आहे. गुजरातमधील ‘वलसाड हापूस’ आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ‘शिवनेरी हापूस’ या नावाने मानांकन मिळावे, यासाठी अर्ज करण्यात आले असून त्यांवर सुनावणी सुरू आहे. त्यातच तामिळनाडू राज्यातूनही ‘हापूस’ला भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोकणातील हापूस आंबा बागायतदार उत्पादक संस्था आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचा गेल्या चार-पाच वर्षांपासून कायदेशीर संघर्ष सुरू आहे. गुजरातकडून करण्यात आलेल्या अर्जावर चेन्नई येथील मुख्य कार्यालय व भौगोलिक मानांकन नोंदणी विभागाच्या मुंबईतील कार्यालयात अंतिम सुनावणी पार पडली. यानंतर व्यापक हिताचा विचार करून तडजोडीचा मार्ग स्वीकारावा आणि सामंजस्याने तोडगा काढावा, अशी सूचना नोंदणी विभागाने केली आहे. त्यामुळे हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे.

लोकप्रतिनिधींचे बळ आवश्यक

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस या अर्जावर अद्याप सुनावणी सुरू आहे. कोकणच्या ‘हापूस’ला भौगोलिक मानांकन मिळाले असताना ते टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी बळ देण्याची मागणी उत्पादकांकडून जोर धरत आहे. कोकणातील आंब्याचे हापूस हे मानांकन अन्य कोणालाही मिळाल्यास आंबा ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, याकडे उत्पादक लक्ष वेधतात. रत्नागिरीतील आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी सांगितले की, कोकणच्या हापूसच्या नाममुद्रेच्या संरक्षणासाठी हापूस उत्पादक आंबा बागायतदार संघाचा लढा सुरू आहे आणि त्यास कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींचे बळ मिळणे आवश्यक आहे. ‘हापूस’ या नावासाठी कोणीही अर्ज केल्यास त्यावर नोंदणी कार्यालयाकडे कोणतीही सुनावणी होऊ नये आणि अर्ज फेटाळला जावा, असा तोडगा निघायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकणातील नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही या संघर्षात कोकणातील हापूस आंबा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले असून उत्पादक संस्थांना आवश्यक मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance