आजकालची मुलं कोणाचं ऐकतच नाहीत, शिक्षकांचा आदर राहिलेला नाही, मुलांमध्ये सहनशीलता आणि शिस्त कमी होत चालली आहे, अशी वाक्ये आजकाल अनेक पालक आणि शिक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. विशेषतः १५ ते १६ वर्षांच्या किशोरवयीन मुलांमध्ये आक्रमकता, नियम मोडणे, मित्रांसमोर वर्चस्व गाजवणे, भांडणे किंवा वस्तूंची तोडफोड करणे अशा वर्तनांबद्दल चिंता व्यक्त केली जाते.
किशोरवयीन मुलांच्या वागण्यामागचं कारण काय?
किशोरवयीन मुलांच्या या वर्तनाकडे केवळ शिस्तीचा अभाव किंवा संस्कारांची कमतरता म्हणून पाहणे योग्य ठरेल का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. मानसशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला, तर किशोरवयीन मुलांचे वर्तन हे त्यांच्या शरीरात, मेंदूमध्ये, भावनिक जगात आणि सामाजिक संबंधांमध्ये घडणाऱ्या बदलांशी जोडलेले असते. या वयात मुलांमध्ये अनेक बदल एकाच वेळी घडत असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर होतो.
या काळात मुलं स्वतःची ओळख शोधत असतात. मित्रांमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कधी कधी त्यांचे वर्तन आक्रमक वाटू शकते. नियम मोडणे किंवा मोठ्यांना उलट उत्तर देणे हे नेहमीच उद्धटपणाचे लक्षण नसते. कधी कधी ते आपले म्हणणे मांडण्याचा किंवा स्वतःचे मत व्यक्त करण्याचा प्रयत्नही असू शकतो.
केवळ शिस्तीचा अभाव की आणखी काही?
पालक आणि शिक्षकांना मुलांचे हे वर्तन चिंताजनक वाटणे स्वाभाविक आहे. मात्र या वर्तनाकडे केवळ शिस्तीचा अभाव म्हणून पाहण्याऐवजी त्यामागची कारणे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. किशोरवयीन मुलांच्या भावनिक जगात घडणारे बदल, त्यांच्यावर येणारा अभ्यासाचा आणि सामाजिक अपेक्षांचा दबाव, तसेच मित्रांच्या वर्तनाचा प्रभाव या सगळ्यांचा त्यांच्या वागण्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांना केवळ रागावण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे अधिक उपयोगी ठरू शकते.
Leave a Reply