अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात राहणारा धावपटू सागर सरोज याचा बदलापूरजवळील कोंडेश्वर येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी धावण्याचा सराव आटोपल्यानंतर तो पोहण्यासाठी गेला होता, तिथेच त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, क्रीडाक्षेत्रात आणि रनहोलिक्स अकॅडमीमध्ये शोककळा पसरली आहे.
सरावानंतर पोहण्यासाठी गेला अन् घात झाला
शनिवारी सकाळी सागर अंबरनाथ येथील कमलधाम आश्रमाजवळील रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. सराव पूर्ण झाल्यानंतर घरी परतण्याऐवजी तो बदलापूर येथील कोंडेश्वर परिसरात पोहण्यासाठी गेला. मात्र, पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अकॅडमीकडून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे आवाहन
सागरच्या अकाली निधनाने त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि रनहोलिक्स अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनामुळे संपूर्ण अकॅडमीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर अकॅडमीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सराव पूर्ण झाल्यानंतर थेट घरी जावे, धोकादायक ठिकाणी जाणे किंवा पोहणे टाळावे, तसेच स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपले आयुष्य केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर कुटुंबीयांसाठीही अनमोल आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नये आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply