जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. उमेदवारी अर्जाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आरोप-प्रत्यारोप आणि संस्कार-स्वाभिमानाच्या चर्चेपर्यंत पोहोचला आहे.
उमेदवारी अर्जावरून वादाची सुरुवात
महायुतीच्या मेळाव्यात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज आपणच अवैध ठरवला होता आणि नंतर तो वैध करण्यासाठीही आपणच प्रयत्न केल्याचे सांगितले होते. या विधानानंतर सुमित पाटील यांनी चव्हाण यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मुलाच्या विधानाचे समर्थन केले.
किशोर पाटील यांचा पलटवार
“महायुतीच्या भर मेळाव्यात एखादा आमदार अर्ज अवैध केल्याचे सांगत असेल, तर आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करत नाही,” असे किशोर पाटील म्हणाले. सुमित पाटील यांचा स्वाभिमान जागृत झाल्यामुळे त्यांनी समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले, असेही त्यांनी सांगितले. एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याकडे असतात, याचा विचार समोरच्याने करावा, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपचा आणि महायुतीचा जबाबदार आमदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत असेल, तर आधी त्याने स्वतःचे संस्कार तपासावेत, असे किशोर पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील यांनाही लक्ष्य
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुमित पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यातील संघर्षावर मध्यस्थी करून दोघांची समजूत काढू, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर किशोर पाटील यांनी “गुलाबराव पाटलांनी व अन्य कोणी मला समजाविण्याचा प्रयत्न करू नये. तेवढी अक्कल, बुद्धी व क्षमता आमच्यात आहे,” अशी टीका केली. या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील वादंग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply