आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामन्यात मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करत ३१३ धावा केल्या आणि भारत अ संघापुढे ३१४ धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या ११ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर मैदानावर वादाची ठिणगी पडली.
बाद होताच मैदानात काय घडले
वैभवने १३ चेंडूंचा सामना करत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या. मोहम्मद इम्रान रंधावा याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत गेला आणि अब्दुल समदने त्याचा झेल पकडला. विकेट मिळताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. यावेळी काही खेळाडूंनी वैभवला उद्देशून काहीतरी म्हटल्याचे दिसले. पॅव्हेलियनच्या दिशेने जात असलेल्या वैभवने मागे वळून पाहिले आणि त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
अभिषेक शर्माच्या हस्तक्षेपाने वाद निवळला
वाद वाढण्याची शक्यता असतानाच भारतीय संघाचा खेळाडू अभिषेक शर्माने वेळीच हस्तक्षेप केला आणि वैभवला रोखले. यावेळी पंचांनीही मध्यस्थी केली, त्यामुळे परिस्थिती निवळली. या प्रकाराचे काही व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत. वैभव बाद झाला तेव्हा भारत अ संघाची धावसंख्या एक बाद २५ अशी होती. भारत अ संघापुढे ३१४ धावांचे मोठे आव्हान असून, हे आव्हान संघ पेलतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply