नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वरच्या पाणथळ क्षेत्रावर यंदाच्या हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांची मांदियाळी जमली आहे. कच्छच्या रणातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत फ्लेमिंगो (राजहंस) चार वर्षांनंतर परतले असून, त्यांच्या गुलाबी-पांढऱ्या थव्यांनी अभयारण्याचे आकाश आणि पाणी दोन्ही रंगवून टाकले आहे. पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे दृश्य म्हणजे एक पर्वणीच ठरत आहे.
फ्लेमिंगोंच्या आगमनापाठोपाठ हिमालय ओलांडून येणारे बार-हेडेड गीजही १५ नोव्हेंबरला नांदूर मधमेश्वरमध्ये दाखल झाले. वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी या पाहुण्यांचे स्वागत केले. त्याआधी टफ्टेड डकचेही आगमन झाले होते. यंदा पाऊस लांबल्याने पाणथळ क्षेत्र कमी झाले असले, तरी स्थलांतरित पक्ष्यांचा ओघ सुरूच आहे.
राज्य पक्षी सप्ताहात (५ ते १२ नोव्हेंबर) नांदूर मधमेश्वरमध्ये झालेल्या पक्षी गणनेत तब्बल ११,७८० पक्षी नोंदवले गेले. गोदावरी आणि कडवा नद्यांच्या संगमावर वसलेले हे अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. २१ जून २०१९ रोजी त्याला रामसरचा दर्जा मिळाला. रामसर क्षेत्र १,४३७ हेक्टर असून, येथे २६५ पेक्षा जास्त पक्षी प्रजाती आढळतात. म्हणूनच या अभयारण्याला ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हटले जाते.
१९०७ ते १९१३ दरम्यान बांधलेल्या दगडी बंधाऱ्यामुळे हे पाणथळ क्षेत्र तयार झाले. मात्र गेल्या काही वर्षांत गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता सुमारे ३० दशलक्ष घनमीटरवरून ७.२७ दशलक्ष घनमीटरवर आली आहे. तरीही हे अभयारण्य दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सैबेरिया, मध्य आशिया आणि युरोपातून येणाऱ्या हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे हिवाळी निवासस्थान ठरते.
फ्लेमिंगोंचे चार वर्षांनंतरचे पुनरागमन आणि बार-हेडेड गीजचे आगमन यामुळे यंदाच्या हंगामात नांदूर मधमेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे. सकाळी आणि संध्याकाळी पाणथळ क्षेत्रावर फ्लेमिंगोंचे थवे, त्यांचे गुलाबी पंख आणि लांब मान पाहणे हा पक्षीप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
फोटो गॅलरी












Leave a Reply