राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने आतापासूनच उपाययोजनांना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी, म्हणजेच ३० जून २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
दोन्ही विभागांच्या समन्वयातून कामे
मृद व जलसंधारण विभागासोबतच कृषी विभागाची यंत्रणाही या कामात सक्रिय केली जाणार आहे. दोन्ही विभागांच्या समन्वयातून जलसंधारणाच्या कामांचा विस्तार आणि वेग वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
मृद व जलसंधारण विभागाची स्वतःची यंत्रणा सक्षम असली, तरी ग्रामीण भागात थेट शेतकऱ्यांशी संपर्कात असलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास कामांचा विस्तार करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यात समन्वय वाढवून संयुक्तपणे कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एल निनोची चिंता, पाण्याचे नियोजन
राज्यात यंदा एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून न राहता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. गावपातळीवर ही कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यासाठी विविध विभागांच्या यंत्रणांचा एकत्रित वापर केला जाणार आहे.
स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना झाल्यानंतर राज्यात जलसंधारणाच्या विविध कामांना गती देण्यात आली आहे. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारख्या योजनांच्या माध्यमातून पाणी साठवण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामांमध्ये प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर विभागाने प्रभावी कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे पूर्ण करायची आहेत, त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रणेचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply