देशाच्या विविध भागात अपघातांची मालिका सुरूच आहे. याच दरम्यान राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतताना धुळ्यातील भाविकांच्या वाहनाचा राजस्थानातील कोटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील सर्व जण धुळे जिल्ह्यातील आहेत. या घटनेने धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तीन वाहनांपैकी एका वाहनाचा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहर आणि जिल्ह्यातील भाविक खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतत होते. त्यांच्यासोबत एकूण ३६ नातेवाईक होते आणि त्यांनी तीन गाड्या केल्या होत्या. वाटेत ते एका हॉटेलजवळ थांबले होते. त्यातील दोन गाड्या मागे होत्या, तर तिसरी गाडी पुढे गेली होती. तितक्यात त्या गाडीचा अपघात झाल्याचे नातेवाईकांना समजले. या वाहनातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर कोटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी धावले.
मृतांची नावे समोर; धुळ्यात शोककळा
अपघातात मृत्युमुखी पावलेल्या लोकांची नावे समोर आली आहेत. धुळे शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे सज्जन पवार, उषा पवार, माधवी पवार आणि सांगवी पवार अशी आहेत. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात कैलास पवार, अनिता पवार आणि जानवी पवार यांचा समावेश आहे. शहादा येथील सुशीला पवार आणि बाबुलाल पवार यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील ९ जणांच्या मृत्यूने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण घटनेने धुळे शहरातील सत्यसाईबाबा नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
Leave a Reply