ऑफिसमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी अनेक जण खूप मेहनत घेतात. वेळेवर काम पूर्ण करणे, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणे आणि टीमसोबत प्रभावीपणे काम करणे, यासाठी खूप प्रयत्न आणि वेळ लागतो. पण कोणीतरी तुमच्याबद्दल वरिष्ठांकडे दिशाभूल करणारी माहिती दिली आणि वरिष्ठांनी त्यावर विश्वास ठेवला, तर परिस्थिती अवघड होते. तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत असाल, तरीही वरिष्ठांच्या नजरेत तुमची चुकीची प्रतिमा निर्माण होऊ शकते. अशा वेळी शांतपणे आणि समजूतदारपणे वागणे महत्त्वाचे असते.
प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका
कोणीतरी तुमच्याबद्दल बॉसकडे वाईट बोलले आहे, हे समजले तर घाईघाईने प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका. स्वतःचे समर्थन करण्याचा सतत प्रयत्न केल्यामुळे लोक तुम्हाला अधिक चुकीच्या पद्धतीने समजू शकतात. सर्वप्रथम बॉसकडे नेमकी काय तक्रार करण्यात आली आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. संधी मिळाली तर बॉसशी खाजगीत बोला, शांतपणे तुमची बाजू मांडा आणि नेमके काय घडले होते, ते स्पष्ट करा. प्रत्येकासमोर स्वतःचे चांगलेपण सिद्ध करण्याची गरज नाही. गरज पडल्यास संबंधित ईमेल किंवा संदेशांचे पुरावे सादर करा.
कामावर लक्ष केंद्रित करा
बॉसच्या नजरेत प्रतिमा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करणे. दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. एखादी चूक झाली तर ती लपवण्याऐवजी दुरुस्त करा. बैठकांमध्ये मोकळेपणाने बोला आणि नवीन कल्पना मांडायला संकोच करू नका. जेव्हा बॉस वारंवार तुमच्या कामाचा दर्जा पाहतो, तेव्हा तुमच्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलू शकतो. कोणत्याही अफवांपेक्षा तुमच्या कामाचे वजन अधिक असायला हवे.
सहकाऱ्यांशी योग्य अंतर ठेवा
ऑफिसमधील प्रत्येकालाच मित्र मानणे शहाणपणाचे नाही. काही लोक तुमच्यासमोर गोड बोलतात, पण नंतर त्याच गोष्टी बॉसपर्यंत पोहोचवतात आणि अनेकदा त्या चुकीच्या किंवा फिरवून सांगितल्या जातात. अशा व्यक्तींजवळ आपल्या वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळा. तसेच ऑफिसमध्ये बॉसच्या किंवा इतर कोणाच्याही बद्दल वाईट बोलणे टाळा. कोणी गप्पाटप्पा करायला सुरुवात केली तर त्यात सहभागी होऊ नका. असे केल्याने तुम्ही अनावश्यक अडचणींतून स्वतःचा बचाव करू शकाल.
आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जपा
बॉसला खूश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आत्मसन्मानाशी तडजोड करू नका. कोणी वारंवार तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवत असेल किंवा तुमच्या कामाचे श्रेय स्वतः घेत असेल, तर गप्प बसण्याची गरज नाही. योग्य वेळी आवाज उठवा आणि तुमच्या कामाशी संबंधित ईमेल किंवा संदेशांची नोंद ठेवा. इतरांसमोर स्वतःची योग्यता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात स्वतःला थकवून घेऊ नका. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा केवळ बॉसच्या मतावर अवलंबून नसते; तुमची मेहनत, कामाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि इतरांशी तुम्ही कसे वागता, या गोष्टींनाही खूप महत्त्व असते.
Leave a Reply