सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वसलेले चाफळ हे समर्थ रामदास स्वामींच्या कार्यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. येथे समर्थांनी स्थापन केलेली दास मारुती आणि प्रताप मारुती अशी दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत. समर्थांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या प्रसिद्ध अकरा मारुती मंदिरांपैकी चाफळमध्ये शके १५७०, म्हणजे इ.स. १६४८-१६४९ च्या सुमारास या दोन मूर्तींची स्थापना केली गेली.
दोन मूर्ती, दोन भाव
चाफळच्या या दोन मूर्तींचे स्वरूप, स्थान आणि भाव एकमेकांहून वेगळे, पण एकमेकांना पूरक आहेत. दास मारुती श्रीराम मंदिराच्या समोर असून, अत्यंत विनम्र भावात दोन्ही हात जोडलेले आहेत. ही मूर्ती सुमारे सहा फूट उंच असून तिची दृष्टी श्रीरामांच्या चरणांकडे आहे. तर प्रताप मारुती, म्हणजेच वीर मारुती, श्रीराम मंदिराच्या पाठीमागे असून तेजस्वी, पराक्रमी व रौद्र मुद्रेत आहे. या मूर्तीच्या पायाखाली दैत्य असून, ती दुष्टांचा संहार करणाऱ्या शक्ती व संरक्षणाचे प्रतीक मानली जाते. एकाच क्षेत्रात नम्र दास भाव आणि पराक्रमी प्रताप भाव एकत्र पाहायला मिळणे हेच चाफळचे मोठे वैशिष्ट्य आहे. प्रताप मारुतीच्या सान्निध्यात समर्थांनी सामर्थ्यशाली भीमरूपी महारुद्रा स्तोत्राची रचना केल्याचा उल्लेख आढळतो.
इतिहास आणि शिवकालीन संदर्भ
सतराव्या शतकात स्वराज्य उभारणीच्या काळात समाजात शारीरिक बळ, निर्भयता, संघटन आणि ईश्वरी भक्ती रुजवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी विविध ठिकाणी हनुमानाच्या मूर्तींची स्थापना केली. चाफळ येथे अंगापूरच्या डोहातून मिळालेल्या श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर राममंदिराच्या आसमंतात भक्ती व पराक्रम या दोन्ही गुणांचे प्रतीक असलेल्या दोन मारुतींची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनीही चाफळच्या देवस्थानच्या जडणघडणीसाठी व उत्सवांसाठी जमिनी आणि देणग्या दिल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. १९६७ च्या कोयना भूकंपात परिसरातील काही वास्तूंना धक्का बसला असला, तरी दास मारुती मंदिर व मूर्ती अबाधित राहिल्याची नोंद आहे. १९७२ मध्ये या मंदिराचा मूळ धाटणीत भव्य जीर्णोद्धार करण्यात आला. चार बुरुज असलेली मजबूत तटबंदी, काळ्या दगडी चौथऱ्यावरील तारकाकृती बांधकाम आणि पाच सुवर्णकलश हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
दर्शन आणि उत्सव
चैत्र पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंतीनिमित्त चाफळमध्ये भक्तिमय आणि उत्साही वातावरण असते. उत्सवाच्या काळात श्रीराम मंदिर, दास मारुती आणि वीर मारुती मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, मारुती स्तोत्र आणि भीमरूपी महारुद्राचे सामूहिक पठण केले जाते. पहाटेपासूनच मूर्तींना अभिषेक, पूजा, शेंदूर-तेल अर्पण आणि आकर्षक शृंगार केला जातो. हनुमान जयंती, दासनवमी तसेच दर शनिवारी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. उत्सव काळात अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्रीराम मंदिर परिसरात वाहनतळ, भक्तनिवास आणि मूलभूत सोयी उपलब्ध आहेत. मंदिर साधारणपणे सकाळी ४:३० ते दुपारी १२:३० आणि दुपारी १:३० ते रात्री ९:०० दरम्यान खुले असते. चाफळला जाण्यासाठी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील उंब्रज फाट्यावरून रस्ता जातो; उंब्रजपासून चाफळ अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर आहे.
Leave a Reply