तुळशी विवाह पार पडल्यानंतर घरोघरी लग्नाची लगबग सुरू होते. लग्न ठरवण्याआधी सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे शुभ मुहूर्त पाहणे. विवाहासाठी शुभ मुहूर्त, वार, नक्षत्र आणि योग या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि मगच लग्नाची तारीख निश्चित केली जाते. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ या दोन महिन्यांत विवाहासाठी एकूण ११ शुभ मुहूर्त समोर आले आहेत. ज्या घरात यंदा लग्नाचे नियोजन आहे, त्यांच्यासाठी ही यादी उपयोगी ठरेल.
नोव्हेंबरमधील शुभ तारखा
नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी चार शुभ तारखा आहेत. २१ नोव्हेंबर २०२६, शनिवार रोजी सकाळी ६.४८ ते रात्री १२.०८ (२२ नोव्हेंबर) हा मुहूर्त आहे. २४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार रोजी रात्री ११.२५ ते सकाळी ६.५२ (२५ नोव्हेंबर) हा मुहूर्त आहे. २५ नोव्हेंबर २०२६, बुधवार रोजी सकाळी ६.५२ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५२ हा मुहूर्त आहे. २६ नोव्हेंबर २०२६, गुरुवार रोजी सकाळी ५.५२ ते सायंकाळी ५.४७ हा मुहूर्त आहे.
डिसेंबरमधील शुभ तारखा
डिसेंबर महिन्यात विवाहासाठी सात शुभ तारखा आहेत. २ डिसेंबर २०२६, बुधवार; ३ डिसेंबर २०२६, गुरुवार; ४ डिसेंबर २०२६, शुक्रवार; ५ डिसेंबर २०२६, शनिवार; ६ डिसेंबर २०२६, रविवार; ११ डिसेंबर २०२६, शुक्रवार आणि १२ डिसेंबर २०२६, शनिवार या तारखा विवाहासाठी शुभ मानल्या जात आहेत.
लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम आणि नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्यामुळे दोघांचे वैवाहिक जीवन सुखी व्हावे, यासाठी ग्रहांची अनुकूलता आणि सकारात्मक सुरुवात महत्त्वाची मानली जाते. पंचांगामध्ये तिथी, नक्षत्र, वार, योग तसेच ग्रहांची योग्य स्थिती पाहून हा मुहूर्त ठरवला जातो. लग्नातील मंगलाष्टके आणि इतर धार्मिक विधी ठरलेल्या वेळेत नीट पार पडावेत, यासाठीही मुहूर्त पाहणे महत्त्वाचे मानले जाते.
दुसरीकडे, यंदा तुळशी विवाह शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरा केला जात आहे. कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला हा विवाह सोहळा पार पडतो. मात्र लोकपरंपरेनुसार कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत, म्हणजे २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही दिवशी तुळशीचे लग्न लावणे शुभ ठरेल.
Leave a Reply