होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ भारतीय जहाजांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भागात भारतीय झेंडा असलेल्या नऊ जहाजांवर केंद्र सरकारचे विशेष लक्ष असून सागरी सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याबाबत आढावा बैठक घेतली आहे.
या बैठकीत सोनोवाल यांनी भारतीय जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली. सागरी प्रशासन महासंचालनालयाला संवेदनशील सागरी क्षेत्रात गस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धोकादायक समुद्री भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेशही मंत्रालयाने दिले आहेत. शिपिंग कंपन्या आणि जहाजांच्या संचालकांशी नियमित संपर्क साधण्यासही सांगण्यात आले आहे.
## गस्त वाढवण्याचे आणि लक्ष ठेवण्याचे निर्देश
जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयाने एक ट्रॅकिंग मॉड्यूल विकसित केले आहे. या मॉड्यूलच्या माध्यमातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ८०० हून अधिक जहाजांवर लक्ष ठेवले जाते. होर्मुझच्या पूर्वेकडील ओमानच्या आखातात २०० हून अधिक जहाजांवर लक्ष ठेवले जाते. या यंत्रणेद्वारे भारतीय जहाजे आणि खलाशांवरही नजर ठेवण्यात येते. आतापर्यंत भारताचा झेंडा असलेल्या जहाजांचे होर्मुझमधून ८६ वेळा दळवळण झाले आहे.
## १६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर सतर्कता वाढली
होर्मुझच्या सामुद्रधुनीत १६ नोव्हेंबर रोजी एका एलपीजी टँकर जहाजावर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर एक भारतीय खलाशी बेपत्ता झाला होता, तर आणखी दोघे जणही बेपत्ता झाले होते. जहाजावरील २४ भारतीय नागरिकांपैकी २१ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. भारताने या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. ओमानमधील भारतीय दूतावास तेथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहे. जखमी खलाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनोवाल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवून त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जहाजांवर हल्ले होत असल्याने खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply