मधुमेह ही जगभरात वेगाने वाढणारी आरोग्य समस्या आहे. लहान वयापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण या आजाराचा सामना करत आहेत. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांना विशेष महत्त्व आहे.
मात्र रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमीच कठीण व्यायाम करण्याची गरज नाही. दररोज फक्त १० ते १५ मिनिटे चालण्याची साधी सवयही फायदेशीर ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चालताना शरीरातील स्नायू रक्तातील ग्लुकोजचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. विशेष म्हणजे, जेवणानंतर थोडा वेळ चालल्यास रक्तातील साखरेची अचानक वाढ नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
चालणे आणि साखर नियंत्रण
चालणे हा अतिशय साधा व्यायाम असला तरी त्याचा शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो. चालायला सुरुवात केल्यावर स्नायूंना काम करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज भासते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायू रक्तातील ग्लुकोजचा वापर करतात. म्हणजेच चालताना स्नायू रक्तातील अतिरिक्त साखर शोषून घेण्यास मदत करतात. विशेषतः टाइप २ मधुमेह आणि प्री-डायबिटीज असलेल्या व्यक्तींना लहान आणि नियमित वॉकचा फायदा होऊ शकतो. याशिवाय चालण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत मिळते.
दररोज १५ मिनिटे चालण्याचे फायदे
नियमित चालण्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. स्नायू ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकतात, त्यामुळे इन्सुलिनला शरीराचा प्रतिसाद सुधारण्यास मदत मिळते. पोटाभोवती जमा होणारी अतिरिक्त चरबी इन्सुलिन रेसिस्टन्सशी संबंधित असते. नियमित चालण्यामुळे कॅलरीज खर्च होतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते; अशावेळी थोडा वेळ चालल्यास स्नायू ग्लुकोजचा वापर करतात, त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी अचानक वाढ कमी करण्यास मदत मिळू शकते. नियमित चालण्यामुळे मन प्रसन्न राहण्यास आणि तणाव कमी होण्यासही मदत होते. तणावाचा परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवरही होऊ शकतो.
चालण्याची सवय लावताना या ७ गोष्टी लक्षात ठेवा
सुरुवातीला दररोज १० ते १५ मिनिटे चाला. शरीराला सवय झाल्यानंतर वेळ हळूहळू वाढवा. आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचे टार्गेट ठेवा. सकाळी, दुपारच्या विश्रांतीत किंवा संध्याकाळी चालण्यासाठी वेळ काढा. सुरुवातीला संथ गतीने चाला. नंतर शरीराच्या क्षमतेनुसार वेग वाढवा. पायांना आरामदायी आणि योग्य आधार देणारे शूज वापरा. चालण्यापूर्वी आणि नंतर हलके स्ट्रेचिंग केल्यास स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. स्मार्टवॉच, मोबाईल अॅप किंवा पेडोमीटरच्या मदतीने रोज किती चाललात, याची नोंद ठेवा.
टीप: वरील माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
Leave a Reply