धाराशिवमध्ये शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ रंगणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त युवा – विकसित भारतासाठी’ या मुख्य संकल्पनेवर आधारित या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विकसित भारत नेतृत्व संवाद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा महोत्सव होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक स्पर्धा आणि रोख पारितोषिके
सांस्कृतिक स्पर्धांअंतर्गत विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. समूह लोकनृत्य, समूह लोकगीत व पथनाट्य आणि कविता लेखन व चित्रकला स्पर्धांत जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकास पात्र ठरणारे संघ विभागीय स्पर्धेसाठी जातील. राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे.
सहभागाच्या अटी आणि नावनोंदणी
सहभागी युवकांचे वय १५ ते २९ वर्षांच्या दरम्यान असावे, युवक जिल्ह्यातील रहिवासी किंवा येथे शिक्षण घेत असावा, तसेच एका युवकास केवळ एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. व्हीबीवायएलडी-२०२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवक या स्पर्धेसाठी पात्र असणार नाहीत. इच्छुकांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. नावनोंदणी विहित नमुन्यातील अर्जासह २३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथे प्रत्यक्ष किंवा ईमेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply