शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याप्रकरणी माफी मागितली आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडण्याच्या नादात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. त्यानंतर या प्रकरणावरून वाद निर्माण झाला. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. फोटो फाडल्यानंतर शायना एनसी यांनी स्पष्टीकरण देत आपण बाळासाहेब ठाकरे यांचा नाही, तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला असल्याचे सांगितले होते. आता या सर्व घडामोडींनंतर त्यांनी माफी मागितली आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत होते, असे त्या म्हणाल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी माफीनामा पोस्ट केला.
माफीनाम्यात काय म्हटले?
शायना एनसी यांनी शिवसैनिकांची माफी मागत पोस्टमध्ये लिहिले की, काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व होते. लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते आपल्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आणि आशीर्वाद लाभले. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच आपल्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते, असे त्यांनी नमूद केले.
बाळासाहेबांचा अनादर करण्याचा आपला कधीच हेतू नव्हता, असे म्हणत त्यांनी पुढे लिहिले की, बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते होते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज आपल्याला नेहमीच प्रेरणा देत आले आहे, असे त्यांनी म्हटले. कालच्या पत्रकार परिषदेत आपण बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, आपल्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. आपला हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच आपण प्रेरणा घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
भावना दुखावल्या असल्यास माफी
बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम आपल्याला पूर्णपणे समजते, असे शायना एनसी म्हणाल्या. आपल्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. आपल्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मनापासून त्यांची माफी मागतो, असे त्यांनी म्हटले. पण, ज्यांनी या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना ठणकावून सांगायचे आहे की, बाळासाहेबांवरचे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी आपल्याला बाळासाहेब शिकवू नयेत, असेही त्या म्हणाल्या. काही नाती आणि काही ऋणानुबंध सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच आपली खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा, असे म्हणत त्यांनी माफीनाम्याचा शेवट केला.
Leave a Reply