आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढत आहेत. यामध्ये हाय कोलेस्ट्रॉलची समस्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची ठरते. यासोबतच काही घरगुती पदार्थांचाही आहारात समावेश केला जातो. असाच एक पदार्थ म्हणजे आलं. आल्यापासून तयार केलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
आल्याचे पाणी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर?
आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा नैसर्गिक घटक असतो. या घटकामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही आलं उपयोगी ठरू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांसाठी आल्याचे पाणी फायदेशीर ठरू शकते.
आल्याचे पाणी कसे तयार करावे?
आल्याचे पाणी बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज नाही. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे पाणी तयार करता येते. सर्वप्रथम आल्याचा एक इंच लांबीचा तुकडा घ्यावा. त्यानंतर त्याची साल काढून आलं स्वच्छ धुवून घ्यावे. एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात आल्याचा तुकडा टाकावा. आता हे पाणी उकळत ठेवावे. पाण्याचे प्रमाण अर्धे होईपर्यंत ते उकळू द्यावे. त्यानंतर पाणी गाळून कपात घ्यावे. पाणी थोडे थंड झाल्यावर प्यावे.
आल्याच्या पाण्याचे इतर फायदे
आल्याचे पाणी केवळ कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठीच नाही, तर आरोग्याच्या इतर समस्यांमध्येही फायदेशीर ठरू शकते. आल्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होऊ शकते. आल्यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. सकाळी मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास कमी करण्यासाठी आलं उपयोगी ठरू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही आल्याचे पाणी मदत करू शकते. आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराचे नुकसान करणाऱ्या घटकांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Leave a Reply