माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम रंगणार आहे. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनच्या आयोजनाखाली पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान माटुंगा येथील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या मैदानावर पार पडणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील जवळपास २४ नामांकित संघ सहभागी होणार असून, जिल्हा विजेतेपदासह राज्य स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
राज्य स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाची निवड
या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे मुंबईचे पुरुष आणि महिला संघ निवडले जाणार आहेत. निवड झालेले संघ २८ नोव्हेंबरपासून अहिल्यानगर येथे सुरू होणाऱ्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे जिल्हा अजिंक्यपदाच्या लढतींबरोबरच राज्य संघात स्थान मिळवण्यासाठीही प्रत्येक खेळाडूला आपले कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीचे सामने बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम चार संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने होतील. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रत्येक संघाला विजयासाठी दमदार कामगिरी करावी लागणार आहे.
उद्घाटन आणि सहभागी संघ
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक रोहित राऊळ यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. माटुंगा पश्चिम येथील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या मैदानावर हा सोहळा पार पडेल. यावेळी व्यायाम मंदिराचे विश्वस्त उमेश नरवणे, मुंबई खो-खो संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरुष गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर, विद्यार्थी क्रीडा केंद्र, सरस्वती स्पोर्ट्स क्लब, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, वैभव स्पोर्ट्स क्लब, अमर हिंद मंडळ, ओम साईश्वर सेवा मंडळ, युवक क्रीडा मंडळ, विजय क्लब आणि संघशक्ती आदी संघ सहभागी होणार आहेत. महिला गटात सरस्वती कन्या संघ, ओम साईश्वर सेवा मंडळ, शिवनेरी सेवा मंडळ, अमर हिंद मंडळ, श्री समर्थ व्यायाम मंदिर, वैभव स्पोर्ट्स क्लब, आर्य सेना, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर आणि संघशक्ती या संघांचा समावेश आहे. मुंबईतील अनुभवी आणि नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्हा विजेतेपदासाठी तसेच राज्य स्पर्धेतील स्थानासाठी खेळाडूंना आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनच्या विश्वस्त अॅड. रुपाली ठाकूर आणि वैशाली भिडे-बर्वे यांनी ही माहिती दिली.
Leave a Reply