महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जाहीर टीका करू नये, असा कठोर निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मित्रपक्षांवर बोलण्यापूर्वी दहावेळा विचार करण्याच्या सूचना आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली.
पक्षांतराच्या मुद्द्यावरही चर्चा
महायुतीतील एका पक्षातील नेते किंवा कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात असल्याच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. काही वेळा एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी पटत नाहीत आणि ती दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेते, असं भुजबळ म्हणाले. मात्र अशा वेळी संबंधित पक्षांनी ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. महायुतीच्या बाहेर जाण्यापेक्षा संबंधित व्यक्ती महायुतीतच राहील, याकडे पक्षांनी लक्ष द्यायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्र्यांवरील आरोपांवर तिन्ही पक्ष एकत्र उत्तर देणार
मुख्यमंत्र्यांवर आरोप झाल्यास तिन्ही पक्ष मिळून त्याला उत्तर देणार आहेत, असा निर्णयही समन्वय समितीने घेतला आहे. नाराजी असेल तर ती जाहीरपणे व्यक्त करण्याऐवजी थेट वरिष्ठांकडे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महायुतीत आता एकमेकांविरोधात बोलायचं नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
शायना एनसी यांच्याशी संबंधित विषयावर विचारलं असता, याबाबत आपल्याला माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही, असं सांगत भुजबळ यांनी अधिक बोलणं टाळलं.
रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. संबंधित घटना घडली त्या दिवशीच शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचं राजकारण करू नये, अशी भूमिका मांडली होती. हा निव्वळ अपघात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे रोहित पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षांच्या भूमिकेचा विचार करायला हवा, असं भुजबळ म्हणाले. या प्रकरणाची चौकशी यंत्रणांकडून सुरू आहे. चौकशीतून काही तथ्य समोर आलं, तर त्यावर भाष्य करता येईल. मात्र, आपल्याला जे वाटतं तेच सत्य असतं असं नाही. पक्षाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आपली भूमिका मांडत असताना रोहित पवार यांनीही संयम राखला पाहिजे, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असल्याच्या मुद्द्यावरही भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नियमबाह्य वसुली किंवा कंपन्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अशा कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनानेही अशा कंपन्यांविरोधात तातडीने कारवाई करावी. सध्या नागरिकांना त्रास देण्याची वेळ नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply