ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. भूस्खलनादरम्यान बेपत्ता झालेले शिक्षक मोहन महाराणा तब्बल १४ दिवस डोंगराजवळील खोल खड्ड्यात अडकून पडले होते. अन्न आणि स्वच्छ पाण्याविना त्यांनी गढूळ पाणी पिऊन आपला जीव वाचवला. शनिवारी एका मेंढपाळाला त्यांचा आवाज ऐकू आला आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.
मोहन महाराणा हे रायकिया ब्लॉकच्या इंद्रगड पंचायतीतील एका शाळेत शिकवतात. २९ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात मोठे भूस्खलन झाले होते. गावातील डोंगराचा काही भाग कोसळल्याने डांगसी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या दुबा गावात पलायन केले. याच दरम्यान मोहन महाराणा डांगसी गावाच्या दिशेने चालत होते. अचानक भूस्खलन झाल्याने आणि अंधारात त्यांचा पाय घसरल्याने ते डोंगराजवळील एका खोल खड्ड्यात पडले. जवळपास कोणीही नव्हते, त्यामुळे मदतीसाठी मारलेली त्यांची हाक कोणी ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी सततच्या पावसामुळे आणि खराब हवामानामुळे त्यांचा आवाज क्षीण झाला. जंगल आणि डोंगराळ भागात अडकल्यामुळे त्यांना कोणीही शोधू शकले नाही.
कुटुंबीयांचा शोध आणि पोलिसांत तक्रार
भूस्खलनानंतर हवामान सामान्य झाल्यावर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. ते सापडले नाहीत, त्यामुळे त्यांनी रायकिया पोलिसांशी संपर्क साधला. हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
मेंढपाळाच्या कानावर आवाज
शनिवारी एक मेंढपाळ आपल्या गुरांसह त्या परिसरात आला. त्याला खड्ड्यातून एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. जेव्हा तो आवाजाच्या दिशेने गेला, तेव्हा त्याला मोहन महाराणा खड्ड्यात अडकलेले दिसले. त्याने तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शिक्षकाला बाहेर काढले. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती. गावकऱ्यांनी एक तात्पुरते स्ट्रेचर तयार केले आणि त्याला सुमारे १८ किलोमीटर पायी रायकिया रुग्णालयापर्यंत घेऊन गेले.
या संपूर्ण घटनेबद्दल मोहन महाराणा यांनी सांगितले की, ते सुंथिया येथे राहत होते. त्या संध्याकाळी ते जेवण बनवत असताना त्यांना कोणीतरी हाक मारत असल्याचे जाणवले. बाहेर येताच त्यांना सर्वत्र पाणीच पाणी दिसले आणि सगळीकडे पूर्ण अंधार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांना शुद्ध आली, तेव्हा ते स्वतःला नदीच्या कोरड्या भागात पाहत होते. आजूबाजूला दगडांचे ढीग होते आणि जवळच फक्त झऱ्याचे पाणी वाहत होते. सुमारे १५ दिवस त्यांनी गढूळ पाण्यावर दिवस काढले. अनेक वेळा मदतीसाठी त्यांनी हाक मारली, पण त्यांचा आवाज कोणी ऐकला नाही. ते ठिकाण दुबा गावापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर, घनदाट जंगलात होते. गेल्या दोन वर्षांपासून ते या भागात राहत आहेत, पण यापूर्वी असा मुसळधार पाऊस कधीही अनुभवला नव्हता, असे त्यांनी सांगितले. दीर्घकाळच्या उपासमारीमुळे आणि गढूळ पाणी प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. ते सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १४ दिवसांच्या मृत्यूशी झुंजीनंतर मोहन महाराणा बरे झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Leave a Reply