गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था; आरोग्याऐवजी अनारोग्य

नाशिक शहरातील उद्याने व जॉगिंग ट्रॅक देखभालीअभावी अवस्थेत आहेत. कचरा, तुटलेली ग्रीन जिम व उघड्या नाल्यांमुळे व्यायामप्रेमी त्रस्त असून दुरुस्तीची मागणी होत आहे.

नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था; आरोग्याऐवजी अनारोग्य

हिवाळ्याची चाहूल लागल्याने शुद्ध हवा आणि तंदुरुस्तीसाठी शहराच्या विविध भागांतून उद्याने व जॉगिंग ट्रॅकवर गर्दी करणाऱ्या नागरिक आणि व्यायामप्रेमींचा हिरमोड होत आहे. एकीकडे थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या अनास्थेमुळे पंचवटी, सातपूर, सिडको, इंदिरानगर, जुने नाशिक आणि वासननगर परिसरातील उद्याने व क्रीडांगणांची दयनीय अवस्था झाली आहे.

कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवरील तुटलेले प्रवेशद्वार, कचरापेट्यांची दुरवस्था आणि अस्वच्छता ही तेथील रोजची स्थिती झाली आहे. गोल्फ क्लब मैदानावरील खेळण्यांची मोडतोड झाली असून पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद आहे आणि स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. कचऱ्याचे ढीग, वाढलेले गाजरगवत, तुटलेली ग्रीन जिमची साधने, उघड्या नाल्यांची दुर्गंधी आणि अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्यासाठी पडणारे हे पाऊल अक्षरशः अनारोग्याकडे नेणारे ठरत आहे.

अनेक भागांत सारखीच अवस्था

कोटी रुपये खर्चून उभारलेली ग्रीन जिमची साहित्ये कुठे गंजून भंगारात निघाली आहेत, तर कुठे चक्क चोरीला गेली आहेत. जुने नाशिकसारख्या दाटीवाटीच्या भागात सुरक्षेअभावी उद्यानांत नशेखोरांचा वावर वाढल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी पाठ फिरवली आहे. इंदिरानगर आणि वासननगरमध्ये उखडलेले जॉगिंग ट्रॅक, धुळीचे लोट आणि उघड्या नाल्यांच्या दुर्गंधीमुळे व्यायाम करणाऱ्यांना उलट श्वसनाचे व गुडघेदुखीचे विकार जडत आहेत.

नागरिकांची संतप्त मागणी

एकीकडे महापालिका नागरिकांकडून विविध प्रकारचे कर वसूल करते, तर दुसरीकडे कोट्यवधींचा निधी खर्च करूनही उद्यानांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे, अशी भावना नाशिककरांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो नागरिक त्रस्त असून या हक्काच्या विरंगुळा व व्यायाम केंद्रांची तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याची जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. आगामी काळात प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष मैदानात उतरून शहराच्या या ऑक्सिजन हबना पुन्हा संजीवनी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance