आजही भारतीय रस्त्यांवर एक चित्र सगळीकडे दिसते. महिला बाईकवर एका बाजूने, एका अंगाने बसलेल्या दिसतात. गावासह शहरात आजही महिलांना ही सवय आहे. महिला बाईकवर एका बाजूला पाय सोडून बसतात. १९८० ते १९९० या दशकात जन्मलेल्या महिला, साडी, लुगडं घातलेल्या महिला आजही एकाच अंगाने बसतात. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही अथवा तशी काही परंपरा सुद्धा नाही. याचं कारण ब्रिटिश इतिहासात दडलंय, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
अशोभनीय वाटते म्हणून…
तशी ही प्रथाच पडली आहे. साडी असो, लहंगा असो वा पंजाबी ड्रेसमधील महिला असो, त्या बाईकवर दोन्ही पाय टाकून बसत नाहीत. तर एकाच बाजूने बसणे पसंत करतात. त्यामागे काही सामाजिक संकेत आहेत. आजच्या जमान्यातील मुली तशा वागत नाहीत. आज तर बुलेट, रॉयल एनफिल्डसारख्या दमदार बाईकही मुली सहज चालवतात. जीन्स, शॉर्ट्समध्ये त्या बाईक चालवतात. पण आजही अनेक महिला दोन्ही बाजूने पाय मोकळे सोडून बाईक चालवत नाहीत. मोठ्या आणि वयोवृद्धांसमोर बाईकवर दोन्ही बाजूने पाय सोडून बसणे आजही अशोभनीय मानले जाते.
ब्रिटिश इतिहासाशी काय संबंध?
पाकिस्तानची युट्यूबर झेनिथ इरफान हिने भारतीय उपखंडातील महिला बाईकवर एकांगी का बसतात, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ती कंटेंट क्रिएटर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने संपूर्ण पाकिस्तान दुचाकीवरून पालथा घातला आहे. मुलीने बाईकर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. ते स्वप्न तिने पूर्ण केले, पण ते पाहायला तिचे वडील हयात नाहीत. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात महिला एकांगी दुचाकीवर का बसतात, याविषयीचा खुलासा केला. दक्षिण आशियात खास करून अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ या देशांत महिला दुचाकीवर एकांगी, एका बाजूने का बसतात, याचं उत्तर तिने शोधलं.
झेनिथच्या मते, नेपाळ, पाकिस्तान, भारतात महिला दुचाकीवर एकांगी बसण्याची पद्धत सामान्य आहे. पण त्यामागे ब्रिटिश इतिहास आहे. झेनिथच्या मते हा ट्रेंड १४-१५ व्या शतकात सुरू झाला. प्रिन्सेस ॲन ऑफ बोहेमिया ही घोडेस्वारी करायची. त्यावेळी ती घोड्यावर एकाच बाजूने बसायची. त्याकाळी दोन पाय टाकून महिलांनी घोड्यावर बसणे अत्यंत असभ्य आणि परंपरेच्या विरुद्ध मानले जायचे. तिने १६०० किलोमीटरच्या परिसरात घोड्यावर एकांगी बसून रपेट मारली होती.
ही काही दक्षिण आशियाची संस्कृती नव्हती. भारताच्या वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचे उदाहरण झेनिथने दिले आहे. राणी लक्ष्मीबाई या बहादुर महिला योद्ध्या होत्या. त्यांनी घोड्यावर दोन्ही बाजूंनी पाय टाकून लढाई लढली. पण जेव्हा ब्रिटिश अंमल सुरू झाला आणि बाईक्स भारतीय रस्त्यावर धावू लागल्या, तेव्हा मात्र महिला एका बाजूला पाय करून बसू लागल्या.
Leave a Reply