जिओचे प्रीपेड सिमकार्ड वापरणाऱ्या अनेक ग्राहकांना कंपनीच्या नावाने एक मेसेज मिळाला असून त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. या मेसेजमध्ये रिचार्ज प्लॅन संपल्याचे सांगत इनकमिंग कॉल कधीही बंद होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटले आहे?
टिपस्टर अभिषेक यादव यांनी एक्सवर या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मेसेजमध्ये इंग्रजीत म्हटले आहे की, तुमचा जिओ रिचार्ज प्लॅन संपला आहे, इनकमिंग कॉल लवकरच कधीही बंद होऊ शकतात, जोडलेले राहण्यासाठी आत्ताच रिचार्ज करा. हा मेसेज मोजक्याच ग्राहकांना पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अभिषेक यादव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, रिचार्ज संपल्यानंतर जिओ एसएमएस आणि इनकमिंग कॉल बंद करणार आहे.
कंपनीचे अधिकृत वक्तव्य नाही
मेसेजमध्ये इनकमिंग कॉल बंद होण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही, त्यामुळे रिचार्ज संपल्यानंतर कॉल नेमके कधीपासून बंद होणार, याबाबत संभ्रम आहे. या मेसेजबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. सहसा कोणत्याही टेलिकॉम कंपनीचा प्रीपेड प्लॅन संपल्यानंतर सर्वात आधी केवळ आउटगोइंग कॉल आणि एसएमएस सुविधा बंद होतात, तर ग्राहक काही काळ इनकमिंग कॉल आणि एसएमएस मिळवू शकतात. जिओच्या संकेतस्थळावरही प्लॅन संपल्यानंतर इनकमिंग कॉल बंद होण्याबाबत कोणतीही मुदत जाहीर करण्यात आलेली नाही.
अभिषेक यादव यांच्या पोस्टवर अनेक ग्राहकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ग्राहकाने म्हटले आहे की, रिचार्ज संपल्यानंतरही इनकमिंग कॉल सुरू राहणे हेच जिओ वापरण्याचे एकमेव कारण होते, मात्र आता जिओनेही इतर कंपन्यांप्रमाणेच वागायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या एका ग्राहकाने म्हटले आहे की, इनकमिंग कॉल सुरू ठेवायचे असतील तर ९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल, अशी चर्चा कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून पसरवली जात आहे.
Leave a Reply