राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्याच्या प्रश्नासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांचे हाल होत आहेत आणि त्याचा दूध उत्पादनावरही मोठा परिणाम होत आहे. या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्यात आला आहे. काही शेतकरी दुष्काळी पट्ट्यात या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
हायड्रोपोनिक तंत्रज्ञान कसे काम करते
हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्राच्या मदतीने केवळ एका बादली पाण्यात, म्हणजेच अवघ्या १५ ते २० लिटर पाण्याचा वापर करून ३० किलो सकस हिरवा चारा तयार केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामध्ये मातीचा अजिबात वापर होत नाही. केवळ पाणी आणि आर्द्रतेच्या मदतीने चारा उगवला जातो. या यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्या ट्रेचा वापर होतो. या ट्रेमध्ये मका, गहू, बार्ली आणि बाजरीच्या बियाणांचा वापर करण्यात येतो.
हे बियाणे भिजवून पसरवले जातात. यंत्रातील स्वयंचलित फोगर्सच्या मदतीने ठराविक वेळेनंतर बियाण्यांवर पाण्याची हलकी फवारणी होते. या नियंत्रित वातावरणात अवघ्या ७ ते ८ दिवसांमध्ये बियाण्यांची जोमदार वाढ होते. यामध्ये ८ ते १० इंच उंचीचा हिरवागार आणि पौष्टिक चारा तयार होतो. या प्रक्रियेत वाया जाणारे पाणी पुन्हा रिसायकल करून वापरण्यात येते. त्यामुळे एका बादली इतक्या कमी पाण्यात ३० किलोपर्यंत चारा उत्पादन घेता येते, असा दावा करण्यात येतो.
यंत्रासाठी किती खर्च येतो
हायड्रोपोनिक चारा निर्मितीचे युनिट उभारण्यासाठी किती खर्च येतो, हे किती क्षमतेचा प्रकल्प उभारला जातो यावर अवलंबून आहे. घरगुती स्तरावर अगदी लहान लाकडी अथवा लोखंडी सांगड्याचा वापर करून युनिट तयार केले तर साधारणपणे १५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. तर पूर्णपणे स्वयंचलित आणि तापमान नियंत्रित आधुनिक यंत्राची किंमत ५० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.
कृषी विभागाकडून काही योजनांमध्ये यासाठी अनुदानाची तरतूद असते. काही जण व्यवसाय म्हणून अशी युनिट उभारत आहेत. यामुळे ग्रामीण भागात हिरवा चाराही उपलब्ध होत आहे आणि व्यवसायातून काहींच्या गाठीशी पैसाही राहत आहे.
Leave a Reply