लग्नसराईच्या तोंडावर सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोमवारी वायदे बाजारात सोन्याच्या दरात २,१०० रुपयांहून अधिकची घसरण झाली आणि सोनं १.३५ लाख रुपयांच्या खाली बंद झालं. चांदीतही ८,४०० रुपयांची घसरण झाली आणि तिचा भाव १.७० लाख रुपयांच्या खाली आला. मागील काही दिवसांपासून ही घसरण सुरूच आहे.
दिवाळीत दर चढले, नंतर घसरण सुरू
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीच्या काळात वायदे बाजारात मोठी तेजी होती. ऑक्टोबरच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर १,३८,४८५ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो ५ नोव्हेंबर रोजी १,४४,०९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. या काळात सोन्याच्या किमतीत ४.०५ टक्के म्हणजेच ५,६१० रुपये प्रति १० ग्रॅम वाढ झाली होती. चांदीच्या दरात तर आणखी वाढ झाली होती. ५ नोव्हेंबरपर्यंत चांदीचा भाव १,८७,१४० रुपये प्रति किलोवर बंद झाला होता, तर ऑक्टोबरच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो १,७९,१३२ रुपये होता. म्हणजेच दिवाळीपूर्वी चांदीच्या दरात ४.४७ टक्के म्हणजेच ८,००८ रुपये प्रति किलो वाढ झाली होती.
मात्र ५ नोव्हेंबरनंतर चित्र पालटलं. १६ नोव्हेंबरपर्यंत वायदे बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १,३४,५३९ रुपये झाला. म्हणजेच या काळात सोन्याच्या किमतीत ६.६३ टक्के म्हणजेच ९,५५६ रुपयांची घसरण झाली आहे. एकट्या १६ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २,१६६ रुपयांची घसरण दिसून आली.
सोनं एक लाखांच्या घरात येणार का?
अशीच घसरण सुरू राहिली तर सोनं आणि चांदी थेट एक लाख रुपयांच्या घरात पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अहवालात म्हटलं आहे. सणांचा काळ संपला असला तरी लग्नसोहळे अजून बाकी आहेत आणि लग्नाच्या हंगामात दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दर आणखी खाली आले तर ग्राहकांना हवे तसे दागिने बनवता येतील आणि त्यांची चिंताही मिटेल, अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply