एकीकडे राज्यात छठपूजेवरून राजकारण सुरू असताना, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी छठपूजेच्या कार्यक्रमादरम्यान केलेले विधान चर्चेत आले आहे. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची अत्यंत गरज असल्याचे विधान मोरे यांनी केले आहे.
कल्याणमधील कार्यक्रमात काय म्हणाले मोरे?
कल्याणमधील दुर्गाडी येथील गणेश घाटावर छठपूजेचा भव्य उत्साह पाहायला मिळाला. मात्र याच छठपूजेच्या व्यासपीठावरून अरविंद मोरे यांनी केलेल्या विधानाने राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी-अमराठी वादाच्या काळात उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी परतले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील उद्योगधंदे, कारखान्यांमधील कामकाज आणि बांधकाम व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा मोरे यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी ‘एक बिहारी सबपर भारी, एक बिहारी दोन ते तीन जणांचे काम एकटाच करतो,’ असे विधान केले.
मनसेकडे रोख असल्याची चर्चा
अरविंद मोरे यांच्या या वक्तव्याचा रोख मनसेकडे असल्याची चर्चा रंगली आहे. छठपूजा हा हिंदूंचा सण असून या उत्सवाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. उत्तर भारतीय आणि बिहारी बांधवांच्या या उत्सवासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी भूमिकाही अरविंद मोरे यांनी मांडली.
त्यामुळे छठपूजेच्या कार्यक्रमातील त्यांच्या या विधानाची कल्याणच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, एकीकडे मनसे छठपूजेला विरोध करत असतानाच आता शिंदेंच्या नेत्याने असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
Leave a Reply