अजित पवार यांच्या मृत्यूवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा तीव्र झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी ‘मफलर मॅन’च्या ओळखीबाबत एक धाडसी दावा केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित दादांच्या कथित मारेकऱ्यांना कोण संरक्षण देत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आठ महिन्यांनंतरही निष्कर्ष नाही
एकनाथ खडसे म्हणाले की, अजित दादांच्या मृत्यूला आठ महिने उलटले तरी निष्कर्ष नाही. कुठेतरी संशयाचे वातावरण आहे आणि ते दूर करण्याची आवश्यकता आहे. समाजाच्या मनात संभ्रम आहे आणि तो संभ्रम दूर झाला पाहिजे. अजित पवार यांच्या मृत्यूला आता जवळपास आठ महिने होत आले आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आजही समाजाच्या मनात अनेक शंका आहेत. हा घात आहे का, खून आहे का, की अपघाताने मृत्यू झालेला आहे, असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची एसआयटीने चौकशी करावी. सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. सरकारने चौकशी सुरू केली असे सांगितले जात आहे. पण आठ महिने होऊनही त्याचा निष्कर्ष अजून समोर आलेला नाही. त्यामुळेच रोहित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी सरकारला स्मरणपत्र द्यावे लागत आहे. एकनाथ खडसे यांनी सांगितले की, सरकार स्वतःहून घोषणा का करत नाही की आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे देत आहोत, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनी कुठेतरी संशयाचे वातावरण आहे आणि ते दूर करण्याची आवश्यकता आहे, अशी भावना व्यक्त केली.
रोहित पवारांचे दावे आणि लढ्याचा निर्धार
दुसरीकडे अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच ठेवण्याचा रोहित पवार यांनी निर्धार व्यक्त केला आहे. अजित दादांची आठवण काढताना ते भावूकही झाले. त्यांनी व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यासोबतच्या आपल्या कथित व्यावसायिक संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांत सिंग यांनी फ्लोरिडामध्ये एक आलिशान बंगला खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला.
Leave a Reply