छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या चार पॅसेंजर रेल्वेंचे जुनाट डबे आता हद्दपार होणार आहेत. त्याऐवजी आता सेकंड क्लास चेअर कार प्रकारचे डबे जोडण्यात येणार आहेत. हा बदल १९ नोव्हेंबरपासून अमलात येणार आहे.
जुन्या डब्यांऐवजी आधुनिक सीबीसी डबे
दक्षिण मध्य रेल्वेने यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की, सध्या पॅसेंजर रेल्वेंना जुन्या आयआरएस (इंडियन रेल्वे स्टँडर्ड) प्रकारचे डबे वापरले जातात. या डब्यांची रचना आणि तंत्रज्ञान कालबाह्य झाले असून, त्याऐवजी आधुनिक सीबीसी (सेंटर बफर कप्लर) प्रकारचे डबे वापरले जातील. सीबीसी ही यंत्रणा लगतच्या डब्याला खेचणे आणि ढकलणे अशा दोन्ही क्रिया करू शकते. तसेच या यंत्रणेमुळे रेल्वेला अधिकाधिक डबे जोडता येतात.
चार गाड्यांचे डबे टप्प्याटप्प्याने बदलणार
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-मनमाड, पूर्णा-आदिलाबाद, परळी वैजनाथ-अकोला आणि पूर्णा-परळी वैजनाथ या चार पॅसेंजर गाड्यांचे डबे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व पॅसेंजर गाड्या एकूण १६ डब्यांच्या राहणार असून, त्यात १४ सेकंड क्लास चेअर कार प्रकारचे आणि दोन एसएलआर प्रकारचे डबे असतील. नांदेड-मनमाड पॅसेंजरला १९ तारखेपासून, पूर्णा-आदिलाबाद पॅसेंजरला २० तारखेपासून, परळी वैजनाथ-अकोला पॅसेंजरला २१ तारखेपासून, तर पूर्णा-परळी वैजनाथ पॅसेंजरला २२ तारखेपासून नव्या डब्यांचा वापर करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
Leave a Reply