श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिदर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी राहणार असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने नांदेड ते बिदरदरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २३ आणि २५ नोव्हेंबर रोजी धावणार असून, नांदेडसह मार्गावरील विविध स्थानकांवरील प्रवाशांना तिचा लाभ मिळणार आहे.
गाडीची वेळ आणि थांबे
गाडी क्रमांक ०७६१५ ही विशेष रेल्वे २३ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता हजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि सायंकाळी ४.३० वाजता बिदर येथे पोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६१६ ही २५ नोव्हेंबरला दुपारी ३.३० वाजता बिदर येथून सुटून रात्री ११.३० वाजता नांदेडला पोचेल. या रेल्वेला पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, कमालनगर आणि भालकी येथे थांबे देण्यात आले आहेत.
२१ डबे; विशेष भाडे
एकूण २१ डब्यांच्या या रेल्वेत तीन एसी चेअर कार, पाच एसी थ्री टियर, सात स्लीपर, चार जनरल आणि दोन लगेज-कम-ब्रेक व्हॅन असतील. या विशेष रेल्वेसाठी नियमित भाड्याच्या १.३ पट दराने विशेष भाडे आकारले जाणार आहे. सण आणि धार्मिक उत्सवांच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांचे नियोजन केले जाते. भाविक आणि प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे.
Leave a Reply