शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ग्रामस्थांवर ऐन हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. गावात कोट्यवधी रुपये खर्चून योजना राबवूनही नागरिकांच्या घरांपर्यंत पाण्याचा थेंबही पोचलेला नाही. नळांना पाणीच येत नसल्याने योजनेच्या कामांवर आणि अंमलबजावणीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रिकाम्या घागरी घेऊन मोर्चा
सोमवारी संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी व हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी कार्यालयाच्या आवारात तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून परिसर दणाणून सोडला. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. गोरेगावात या योजनेवर भरमसाठ निधी खर्च झाला असून कामे पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी महिलांना दैनंदिन कामे सोडून वणवण करावी लागत आहे. योजनेच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले गेले असून, या कामांची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. या आंदोलनात भास्करराव पाटील, संतोष कावरखे, विठ्ठल साळुंखे, कैलास देवकर, राजू देवकर यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
२३ नोव्हेंबरला जनआंदोलनाचा इशारा
गावातील पाणीटंचाई ही मानवनिर्मित असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने गोरेगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा; अन्यथा २३ नोव्हेंबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे.
Leave a Reply