यंदा राज्याच्या अनेक भागांत पाऊस अपुरा पडला आणि त्याचे वितरणही असमान राहिले. त्यामुळे रब्बी हंगामात पाणीटंचाईचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, विहिरी आणि बोअरवेलमधील घटणारी पाणीपातळी, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यांचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाची वाट पाहणे किंवा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण क्षेत्रावर पेरणी करणे योग्य ठरणार नाही. सद्यःस्थितीचा अंदाज घेऊन पाण्याचे बजेट तयार करणे, जमिनीतील ओलावा तपासणे, कमी पाण्यात येणारी पिके निवडणे, पीक विविधीकरण करणे, आच्छादनाचा वापर करणे आणि पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत संरक्षित सिंचन देणे या उपायांना प्राधान्य द्यावे, असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.
पेरणीपूर्वी काय तपासावे
रब्बी पेरणीची घाई न करता शेतातील परिस्थितीचा आढावा घेऊन लागवड नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीतील ओलावा, पाण्याचा साठा, जमिनीचा प्रकार, पीक कालावधी तसेच उत्पादन खर्च आणि बाजारपेठ या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आहे का, हे तपासावे. केवळ वरचा थर ओला आहे म्हणून पेरणीची घाई करू नये. विहीर, बोअरवेल, शेततळे किंवा कालव्यामधून प्रत्यक्ष किती पाणी उपलब्ध होईल, याचा अंदाज घेऊन पिकाचे नियोजन करावे. हलकी, मध्यम, खोल काळी किंवा भारी जमीन यानुसार पीक पद्धतीची निवड करावी. कमी कालावधीत तयार होणाऱ्या आणि कमी पाण्यात येणाऱ्या वाणांच्या निवडीस प्राधान्य द्यावे.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवड
रब्बीचे नियोजन करताना एकूण उपलब्ध क्षेत्राचे तीन भाग करावेत. पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र, मर्यादित सिंचनाचे क्षेत्र आणि खात्रीशीर सिंचनाचे क्षेत्र. त्यानुसार स्वतंत्र पीक नियोजन करावे. पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास हरभरा, रब्बी ज्वारी किंवा करडई यांचा विचार करावा. हलक्या जमिनीत ओलावा अपुरा असल्यास पेरणीची घाई करू नये. जमिनीत ओलावा नसल्यास महागडे बियाणे, खते आणि इतर निविष्ठांवर मोठा खर्च करू नये. मर्यादित सिंचन असलेल्या क्षेत्रात संपूर्ण क्षेत्रावर गहू लावण्याऐवजी हरभरा, करडई किंवा रब्बी ज्वारीला प्राधान्य द्यावे. गहू किंवा पाण्याची अधिक गरज असलेली पिके केवळ खात्रीशीर पाणी उपलब्ध असलेल्या मर्यादित क्षेत्रावर घ्यावीत. पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थांसाठी सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे. खात्रीशीर सिंचन असलेल्या क्षेत्रात गहू, हरभरा आणि इतर योग्य रब्बी पिकांचे नियोजन करता येईल. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. पाण्याचा अनावश्यक वापर टाळून सिंचनाचे वेळापत्रक तयार करावे. मात्र, कोणतेही पीक सर्व प्रकारच्या जमिनीत आणि प्रत्येक जिल्ह्यात एकसारखे यशस्वी होईल असे नाही. पेरणीपूर्वी संबंधित कृषी विद्यापीठाच्या जिल्हानिहाय शिफारशी तपासाव्यात.
ओलावा टिकवणे आणि सिंचनाचे नियोजन
दुष्काळी परिस्थितीत जमिनीतील प्रत्येक थेंब पाणी महत्त्वाचा असतो. पिकांचे अवशेष आच्छादन म्हणून वापरता येतात. पीक अवशेष जाळू नयेत. ज्वारीचे धसकट, सोयाबीनचे अवशेष आणि काडीकचरा सेंद्रिय आच्छादनासाठी वापरावे. बांधबंदिस्ती करावी. सिंचनाचे पाणी मर्यादित असल्यास पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये उपलब्ध पाणी देण्यास प्राधान्य द्यावे. ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करावे. पाटपाणी देणे टाळावे. जमिनीतील ओलावा तपासूनच नंतर सिंचन करावे. पाण्याचा ताण पडल्यास दुपारी पाने कोमेजणे आणि फुलगळ होणे अशी लक्षणे दिसतात. तेव्हा प्रथम जमिनीतील ओलावा तपासून पिकाच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन द्यावे. तण नियंत्रण करावे. केवळ संजिवकांच्या फवारणीने पाण्याची कमतरता भरून निघत नाही. एकाच पिकावर संपूर्ण क्षेत्र अवलंबून ठेवू नये. रब्बी ज्वारी अधिक हरभरा किंवा करडई अधिक हरभरा अशा आंतरपीक पद्धतीचा विचार करावा. पीक निवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. बियाणे आणि इतर निविष्ठा खरेदी करताना पावती अवश्य घ्यावी. पीक विम्याची माहिती घेऊन कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संपर्कात राहावे.
Leave a Reply