महाराष्ट्रात आता हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. विशेषतः पहाटे आणि सकाळच्या वेळी वातावरणात गारवा वाढत असून, अनेक ठिकाणी नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका कायम असल्याने नागरिकांना बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील कमाल तापमान अजूनही ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे, त्यामुळे सकाळी थंड वातावरण तर दुपारी उष्णता अशी संमिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
धुळ्यात सर्वात कमी तापमान
धुळे येथे राज्यातील सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. परभणी कृषी केंद्रात १०.५ अंश, निफाडमध्ये ११.५ अंश आणि जेऊर येथे १२ अंश तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय गोंदिया येथे १२.६ अंश, तर यवतमाळमध्ये १२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एकूणच राज्यात थंडीची सुरुवात झाली असली, तरी दुपारचे तापमान जास्त असल्याने नागरिकांना संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे.
येत्या दिवसांत गारवा आणखी वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सकाळच्या थंडीत वाढ होऊ शकते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात हवामानात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. मध्य बंगालच्या उपसागरात उद्या चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय दक्षिण तमिळनाडू आणि आसपासच्या भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलांवर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
Leave a Reply