सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नवं घर घेताना मावशींनी एफडीचे पैसे देऊ केले

अभिनेत्री आरती वडगबाळकरने नवं घर घेताना पैशांची चणचण असताना घरी काम करणाऱ्या मावशींनी एफडीचे पैसे घेण्याची तयारी दाखवल्याची भावुक आठवण एका मुलाखतीत सांगितली.

नवं घर घेताना मावशींनी एफडीचे पैसे देऊ केले

आपल्या आयुष्यात कधी कोणती व्यक्ती काय बनून येईल हे आपल्यालाही समजत नाही. अगदी सर्वसाधारण वाटणारी समोरील व्यक्ती ही आपल्यासाठी बहुमूल्य ठरू शकते. घरात आणि ऑफिसमध्ये वावरत असताना बऱ्याच महिलांना त्यांच्या कामवाल्या मावशींवर अवलंबून राहावे लागते. एका सर्वसाधारण घरातून आलेल्या या मावशी किंवा ताई बरेचदा स्वतःचे कुटुंब म्हणून समोरच्या घरात काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत एक घरोबा तयार होतो. अभिनेत्री आरती वडगबाळकर हिने एका मुलाखतीत तिच्या घरी काम करणाऱ्या कामवाल्या मावशींचा एक भावुक किस्सा शेअर केला.

आरती वडगबाळकर म्हणाली की, आम्ही सुरुवातीला सुयश टिळक, क्षितिज, सिद्धार्थ चांदेकर वगैरे एकत्र एका रूममध्ये राहायचो. पुढे आम्ही प्रत्येकाने आपापले घर विकत घेतले. आम्ही जेव्हा गोरेगावमध्ये स्वतःचे घर घेतले तेव्हा सर्वांचीच धावपळ चालू होती. प्रत्येक जण आपल्या घरासाठी पैशांची जुळवाजुळव करत होता. आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी रोज आमची ती धावपळ बघत होत्या की पोरं काहीतरी करत आहेत, मेहनत करत आहेत हे त्यांना कळत होते.

मावशींनी बोलवताच झालेला गैरसमज

एक दिवस त्यांनी मला बोलावले आणि मला म्हणाल्या की मी तुला स्पष्टच विचारते, तू काही मनात वेगळे आणू नकोस. त्या असे म्हणाल्यावर आरतीच्या मनात विचार आले की नेमके आत्ताच मावशींनी पैसे वाढवून मागितले तर काय होईल, कारण आपलीच आता इतकी वाट लागली आहे, मग यांना पैसे कसे वाढवून द्यायचे. या सर्व घराच्या धावपळीत आपण आणखी पैसे कुठून आणणार, त्यांना नाही तरी कसे म्हणायचे, असा विचार तिच्या मनात आला.

कामवाल्या मावशींच्या मनाचा मोठेपणा

आरतीने पुढे सांगितले की त्या मला म्हणाल्या, मी थेटच बोलते बघ, तुला चालणार असेल तर माझी आता एक एफडी मॅच्युअर होते आहे. तुम्हाला आता घरासाठी लागणार असेल तर ते पैसे घ्या. ते ऐकल्यावर मला रडू आले. काय बोलणार होते मी यावर. आणि आम्ही सगळेच मुले होतो, त्यामुळे त्या कोणाकोणाला पैसे देणार होत्या. तरीही त्या बोलल्या की माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तुम्हाला काहीही कोणाला गरज पडली तर मला आवर्जून सांगा. मी त्यांना म्हणाले की हे बोलणेच खूप आहे माझ्यासाठी.

बरीच वर्षे त्यांनी आरतीकडे काम केले. जेव्हा आरती गोरेगावला गेली तेव्हा त्या तिचे घर लावायला आल्या. तिच्या मुलाला राघवला पहिल्यांदा गोरेगावच्या घरात घेऊन गेलो तेव्हाही त्याला ओवाळायला त्या आल्या. आता त्यांचे वय झाले आहे. पण त्यांची पुतणी आरतीकडे काम करते. ती त्यांचीच सावली आहे, त्यामुळे आरती खूप निश्चिंत असते. सख्खे पण कोणी करणार नाहीत आजकालच्या काळात तितके त्या करतात. अजून सुद्धा त्या आपुलकीने आणि प्रेमाने सर्वांचे सर्व करतात.

जेव्हा आरती आणि तिचे मित्र एकत्र मुले मुले राहायचो तेव्हा सुद्धा त्या सर्वांना गरमागरम जेवण वाढवून द्यायच्या. जेवण गरम असले की ते अधिक खाल्ले जाते. एकदा तर त्यांनी सर्वांसाठी तीन वेळा कणिक मळले होते, इतक्या पोळ्या त्यांनी गरमागरम वाढून दिलेल्या. शेवटी आरतीने त्यांना म्हटले की मावशी बसा, तुम्ही करत राहिलात तर ते खात राहतील, पण तरीही त्या थकल्या नाहीत, उलट बोलल्या की जाऊ दे, पोरांना भूक लागली आहे, त्यांना खाऊ देत. त्या आरतीसाठी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. अभिनेत्री आरती वडगबाळकर सध्या रंगभूमीवर अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत ‘पुन्हा नक्की भेटू या’ नाटकात काम करत आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance