शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

राष्ट्रवादी विलिनीकरणाला ब्रेक; शरद पवार NDA मध्ये जाणार?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागला असून शरद पवार यांचा पक्ष विलिनीकरणाशिवाय स्वतंत्रपणे NDA मध्ये सहभागी होण्याचा पर्याय शोधत आहे.

राष्ट्रवादी विलिनीकरणाला ब्रेक; शरद पवार NDA मध्ये जाणार?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना गेल्या दोन आठवड्यांत मोठी हवा मिळाली. मुंबई, पुणे, बारामती आणि दिल्लीत या विषयावर चर्चा रंगल्या. मात्र एकत्रीकरणाचे गाडे कोणीच पुढे हाकले नाही आणि चर्चा वांझोट्या ठरल्या. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. विलिनीकरण जरी होणार नसले तरी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा पर्याय शोधत असल्याचा सूर उमटत आहे.

विलिनीकरणाची चाचपणी

सत्तेतील राष्ट्रवादीने विलिनीकरणाची चाचपणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाने काही आमदारांशी संपर्क साधला आणि विलिनीकरणाविषयी त्यांचे मत जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे. विलिनीकरण झाल्यावर पक्षाची स्थिती, बड्या नेत्यांचे राजकीय अस्तित्व, पक्षीय बांधणी, पक्षीय जबाबदारी आणि पक्षीय नेतृत्व या सर्व अंगाने विचारविनिमय झाल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीलाही गेले. या सर्व घडामोडीत सत्ताधारी राष्ट्रवादीतही शक्कलं होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीतील हा गट शरद पवार यांच्या पक्षासोबत जाऊन सत्तेत जुळवून घेण्याची कसरत करत असल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत.

शरद पवार NDA जवळ करणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष म्हणून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिल्लीत स्पष्ट सांगितले की, अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र त्यानंतर सुळे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यात एक बैठक झाल्याची माहितीही समोर आली आहे. विलिनीकरण झाल्यास केंद्रातही एकत्रित पक्षाला चांगली पदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत आणि याविषयीची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हिवाळी अधिवेशनापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून त्यात महिला विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला बहुमताची गरज आहे. त्यातूनच या चर्चा समोर आल्याचे सांगितले जात आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance