मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या समोर त्याच्याच चित्रपटातील गाणे गाण्याचे भाग्य दृष्टिहीन गायिका शेख नाझनिन हिला मिळाले. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेख नाझनिन हिने सचिन पिळगावकर यांच्या हिंदी चित्रपटातील ‘आँखियों के झरोखों से’ हे गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
अविस्मरणीय आणि आध्यात्मिक क्षण
हा कार्यक्रम दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दीपस्तंभ फाऊंडेशनचे विद्यार्थी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन पिळगावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेख नाझनिन हिने आपल्या इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले की, हा एक खरोखरच अविस्मरणीय आणि आध्यात्मिक क्षण होता. महान सचिन पिळगावकर यांच्यासमोर त्यांच्या क्लासिक चित्रपटातील ‘आँखियों के झरोखों से’ हे अजरामर गाणे सादर करण्याचे भाग्य तिला मिळाले. त्यांच्यासमोर गाताना तिच्या हृदयात असीम भक्ती आणि तिच्या आवाजात एक अनोखी भावना दाटून आली. त्यांचे प्रेम आणि हा क्षण आयुष्यभर तिच्या हृदयात जपून राहील, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.
‘हीच अमुची प्रार्थना’ही झाले होते व्हायरल
शेख नाझनिन ही डोळ्याने अंध असून तिने याआधीही बऱ्याच ठिकाणी गाणी गायली आहेत. ती पेशाने गायिका असून तिने पाणी फाऊंडेशनच्या मंचावर गायलेले ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गाणेही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल ना…’ या गाण्यातील ही ओळ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या गाण्यामुळे सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात आली होती.
या गाण्यामुळे शेख नाझनिनचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. तसेच तिच्या गायकीला पसंती मिळत आहे. सोशल मीडिया युजर्सनी म्हटले आहे की, ‘डोळ्यांनी जग पाहता येतं, पण मनाला स्पर्श करण्यासाठी असा आवाज लागतो!’ काहींनी ‘खूप छान ताई, तुमचा आवाज खूप छान आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युजरने म्हटले आहे की, ‘मी 20 ते 25 मिनिटे व्हिडिओ पाहिला, माहीत नाही कितीवेळा रिपीट झाला. काय आवाज दिलाय रे देवाने, सोनेरी आवाज आहे.’
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply